दौंड तालुक्यातील अपघाताची शक्यता
रावणगाव- दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरू झाला आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टरचा लावण्याचा नियम पायदळी तुडविला जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांकडून नियम धाब्यावर बसविला जात आहे.
दौंड तालुक्यात भीमा सहकारी साखर कारखाना, अनुराज शुगर आणि दौंड शुगर तसेच आजूबाजूच्या साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम सुरु आहे. या परिसरात अनेक ट्रॅक्टर , ट्रक, टायर बैलगाड्या ऊस वाहतूक करतात. ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या या वाहनांना नियमानुसार रिफ्लेक्टर बसविणे बंधनकारक आहे. तरी देखील बहुतांश वाहनांना दर्शनी ठिकाणी रिफ्लेक्टर बसविल्याचे दिसून येत नाही. अशी रिफ्लेक्टर नसलेली ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीच्या वेळी दिसून येत नाहीत. या परिसरात पाठीमागून वाहने धडकण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशा अपघातांमुळे स्वतःबरोबरच दुसऱ्याचा बळी जाण्याची शक्यता देखील अनेकवेळा नाकारता येत नाही. अनेक ट्रॅक्टर चालक हे कर्णकर्कश आवाजात गाणी लावून जात असतात. त्यामुळे मागील वाहनांनी कितीही जोरात हॉर्न वाजवला तरीही त्यांना ऐकू नाही. त्यामुळे गाणी ऐकण्याच्या नादात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक, टायर बैलगाडीला चारही बाजूने दर्शनी ठिकाणी चांगल्या दर्जाचे रिफ्लेक्टर बसविल्यास तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास अपघाताची शक्यता कमी होऊ शकते. संबंधित विभागाकडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत दरवर्षी जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, वाहतूकदार याबाबत निद्रिस्त असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा