ऊसतोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित

  • शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची गरज : तालुक्‍यात एकूण चार साखर कारखाने

केडगाव – ऊस तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे.
केडगाव आणि परिसरात ऊसाचे भरीव उत्पादन घेतले जाते. त्यामुळे उसाचे गाळप करण्यासाठी तीन खासगी आणि एक सहकारी असे चार साखर कारखाने असून सुमारे 1000 च्यावर गुऱ्हाळांची उभारणी झाली आहे. गुऱ्हाळासाठी ऊस उपलब्ध व्हावा, म्हणून गुऱ्हाळमालकांनी टोळ्या केल्या असून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी मजूर परप्रांतातून दाखल झाले आहेत. परंतु ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मात्र त्यामुळे निर्माण होत आहे. कुटुंबाबरोबर ही मुले स्वतःचे गाव सोडून परगावी आल्याने शाळा अर्धवट सोडावी लागते. ज्या ठिकाणी ऊसतोडणीचा फड उपलब्ध आहे.त्या ठिकाणी आपल्या आई-वडिलांच्याबरोबर जावे लागत असल्याने ते शिक्षणापपासून दूर जात आहेत. शिक्षणाच्या वयात ही मुले उसाच्या फडात पालकांना मदत करतात किंवा लहान भावांना सांभाळून कुटुंबाला हातभार लावत असल्याची आढळतात. ज्या वयात पाटी आणि पेन्सिल घ्यायची त्या वयात त्यांच्या हातात लहान भावांच्या पाळण्याची दोरी येते. शासनाने शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावे, अशी व्यवस्था केली आहे. मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या लहानग्या मुलांकडे पाहिल्यानंतर व्यवस्था अपुरी पडत असल्याचे आढळत आहे. भल्या पहाटे फडावर जाताना त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतो. कुपोषणाची समस्या निर्माण होते. त्यामुळे शासनाने बालकांच्या शिक्षणाचा कायदा केल्यानंतरही अनेक ऊसतोडणी मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)