उस्थळ दुमालात बॅंकेसमोर खातेदारांचे उपोषण

प्रातिनिधिक छायाचित्र

नेवासा – तालुक्‍यातील उस्थळ दुमाला येथील सेंट्रल बॅंकेची मिनी शाखा चालविणाऱ्या शेखर राजेंद्र पिटेकर याने खातेदारांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे, असा आरोप खातेदारांनी केला. पिटेकर यांनी शाखा बंद करून पोबारा केला. तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही बॅंकेकडून काहीही कारवाई न झाल्याने संतप्त खातेदारांनी बॅंकेपुढे सोमवारी उपोषण केले. एक महिन्यात सर्व खातेदारांचे पैसे परत करण्याचे लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

उस्थळ, निपाणी निमगाव, बाभूळवेढा ग्रामस्थांनी बॅंकेपुढे उपोषण केले. हे प्रकरण निकाली काढून खात्यावर पैसे जमा करू, तसेच बॅंकेकडून पिटेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू, असे लेखी आश्‍वासन बॅंक शाखाधिकारी मुळे यांनी दिले.

उपोषणातील खातेदार म्हणाले की, उस्थळदुमाला येथील शेखर राजेंद्र पिटेकर याने सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाची मिनी शाखा (नवीन चांदगाव) येथे सुरू केली होती. तेथील सर्व कामकाज तो पाहत होता. बॅंक खातेदारांचे नवीन जन-धन खाते उघडणे, पैशांचा भरणा करून घेणे, विड्रॉल करणे, मुदतठेव पावत्या देणे, वीजबिल भरणा करणे ही कामे तो करत होता. परंतु, त्याने खातेदारांच्या नावावर असलेल्या लाखो रुपयांच्या रकमा काढून फसवणूक केली असून तो फरार झाला आहे. खातेदारांची फसवणूक करणाऱ्या शेखर पिटेकर यास पोलिसांनी अटक करावी. बॅंकेने खातेदारांची शाखाचालकाने नेलेली रक्कम खात्यावर त्वरित जमा करावी, अशी मागणी केली.
व्यवस्थापक रामेश्‍वर मुळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन खातेदार हे मोलमजुरी करणारे कष्टकरी, शेतमजूर असल्याने त्यांची गेलेली रक्कम परत मिळावी म्हणून वरिष्ठांकडे मागणी केली. तसेच, भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी म्हणून मागणी केली.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी याबाबत आपण फरार आरोपीला शोधून आणू व कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली. शाखा व्यवस्थापक मुळे यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार एक महिन्यामध्ये याबाबत कार्यवाही होऊन खातेदारांची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)