उर्से, शिवणे, रावेत बंधाऱ्याला “हिरवा कंदील’

पिंपरी – जलसंपदा विभागाने पवना नदीवर उर्से, शिवणे व रावेत येथे कोल्हापूर पध्दतीचे तीन बंधारे बांधण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरवासियांसह उर्से व शिवणेतील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यास मदत होणार असल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सद्य स्थितीमध्ये 490 एम.एल.डी पाणी पिंपरी-चिंचवड महापालिका रावेत बंधाऱ्यातून उचलते. हा बंधारा शंभर वर्षापूर्वीचा असल्याने त्याची आयुमर्यादा संपली आहे. या बंधाऱ्या लगत नव्याने बंधारा बांधण्याच्या संदर्भात महापालिकेने 2013 साली जलसंपदा विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु, आजतागायत हा प्रश्‍न लोंबकळत पडला होता. पवना बंद जलवाहिनी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र जलसंपदा नियम प्रधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार उर्से व शिवणे या ठिकाणी कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याच्या संदर्भात तत्काळ कारवाई होण्याची मागणी होत होती.

-Ads-

या पार्श्‍वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांना पत्र पाठवून बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार, मुंबई येथे शिवतारे यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीस शिवतारे, खासदार बारणे तसेच जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता चोपड, कार्यकारी अभियंता शेलार, उपअभियंता मठकरी, पिंपरी महापालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे आदी उपस्थित होते.

अधिक माहिती देताना खासदार बारणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित असलेल्या पवना बंद जलवाहिनी योजनेचे काम पुर्णपणे बंद पडले आहे. पिंपरी-चिंचवडला रावेत बंधारा येथून पाणी उचलून पाणी पुरवठा केला जातो. एक दिवस पुरेल एवढाच पाण्याचा साठा या बंधाऱ्यावर उपलब्ध असतो. हा बंधारा ब्रिटीश काळातील असून 100 वर्षा पेक्षा जास्त काळ या बंधाऱ्याला झाला आहे. जलसंपदा विभागाच्या निकषानुसार या बंधाऱ्यांची वयोमर्यादा संपली आहे. या बंधाऱ्यालगत नवीन बंधारा बांधण्यासाठी महापालिका 2013 पासून पाठपुरावा करत असल्याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. त्यावर जलसंपदा विभागाने उर्से, शिवणे, रावेत येथे कोल्हापूर पध्दतीने बंधारे बांधण्यास मंजुरी दिली. तसेच त्यासाठीच्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)