डॉ. येळगावकर यांचा आ. गोरेंवर निशाणा : पिंगळीत पाणी पोहोचण्याआधीच करा पूजन
गोंदवले, दि 24 (प्रतिनिधी)- जिहे- कटापूर योजनेला सुधारित प्रशाकीय मंजुरीनंतर निधी प्राप्त झाला असून उरमोडी योजनेचे पाणी नवीन कालवा खोदून ब्रिटीशकालीन पिंगळी तलावात सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनांचे आम्ही ट्रस्टी आहोत तर लोकप्रतिनिधी फक्त पाणीपुजनाचे पुजारी आहेत. ते पैशाच्या जोरावर बॅनर बाजी करत असून दांडगावा केल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिला. दरम्यान, मुख्यमंत्री यांच्या आदेशाने व ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. महाजन, ना. शिवातारे यांच्या प्रयत्नातून पिंगळीत पाणी येत आहे. पाणी पोहोचल्यावर आम्ही आमचे मंत्री आणून पूजन करणारच आहोत, तूर्तास पूजाऱ्यांनी आधी पूजन करावे, आमची हरकत नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
दहिवडी, ता. माण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष, जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई, बाळासाहेब मासाळ, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, विजय साखरे, शिवाजी शिंदे, डॉ. उज्वलकुमार काळे, दादासाहेब काळे आदी उपस्थित होते.
डॉ. दिलीपराव येळगावकर म्हणाले, आंधळी धरणात जिहे-कटापूर योजनेचे पाणी आणण्यासाठी अडथळे येत होते. ते आता दूर करण्यात आले आहेत. शिरवलीच्या ताराचंद जगदाळे यांची जमीन कालव्यात जात होती. त्यावर जिल्हा बॅंकेचे कर्ज होते. त्याबाबत बॅंक आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मिटवला. त्यांना बागायत क्षेत्राप्रमाणे मोबदला दिला जात नव्हता. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वेठणे व शिरवली या दोन्ही बाजूने बोगद्याचे काम सुरू करून आंधळी धरणात पाणी सोडले जाईल व माणगंगा नदी प्रवाहित करण्यात येईल व त्यातून नदीवर असलेले 21 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेतले जातील. यासाठीचे काम युद्धापातळीवर सुरु आहे. जिहे-कटापूर पाणी योजना रखडवण्याचे महापाप आघाडी शासनाने केले. आंधळी धरणात पाणी आल्यानंतर माण तालुक्याच्या उत्तर भागातील वारुगड ते कारखेल या 32 गावांचा व खटाव तालुक्यातील दरूज ते कणसेवाडी येथील 16 गावांचा समावेश जिहे-कटापूर योजनेत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे माण व खटाव मधील पाण्याचा प्रश्न सूटला जाईल.
त्यांना दहा वर्षात टेंडरही काढता आलं नाही
पत्रकार परिषदेत आ. जयकुमार गोरे यांचे नाव न घेता येळगावकर म्हणाले, लोकप्रतिनिधीना जिहे-कटापूर योजनेचा कसलाही अभ्यास नाही. मात्र पाणी आणणार असा खोटा डांगोरा पिटून केवळ स्टंटबाजी करीत जनतेची दिशाभूल करित आहेत. कॉंग्रेसचे सरकार असताना आणि मुख्यमंत्री खिशात असताना दहा वर्षात त्यांना पिंगळी कालव्याचे टेंडर काढता आले नाही. ते कसलं पाणी आणणार आहेत. आता माण-खटावच्या जनतेने या भूलथापाला बळी पडू नये. माणस गोळा करायला यांना स्पीकर लावावा लागत आहे, ही त्यांची शोकांतिका म्हणावी लागेल.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा