उरमोडीच्या श्रेयवादात खरा नायक दुर्लक्षित

गोंदवले बुद्रुकच्या स्व. वसंतराव पाटील यांच्या संघर्षाचा सर्वांना विसर

गोंदवले, दि. 2 (वार्ताहर) – उरमोडी प्रकल्पातून माण-खटावला पाणी आले अन्‌ श्रेयावादातून गाजावाजात जलपूजनेही झाली. परंतु, प्रकल्पाचे खरे जलनायक गोंदवले बुद्रुकचे वसंतराव पाटील व त्यांचा संघर्ष दुर्लक्षितच राहिला. वसंतराव यांनीच सर्वप्रथम 1989मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यापुढे हा धाडसी प्रस्ताव मांडला व त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यास यश येवून 1995 वडूजमध्ये योजनेच्या कालव्याच्या कामाला प्रारंभ झाला. या कष्टाचे चीज झालेले पाहण्यासाठी वसंतराव हयात नाहीत. जलनायकाचा सर्वांना विसर पडला आहे.
सातारा तालुक्‍यातील सिंचनासाठी परळी खोऱ्यात उरमोडी धरणाची निर्मिती करण्यासाठी तत्कालीन आमदार अभयसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतला. एकूण पाणीसाठवण क्षमता 2.93 अब्ज घनफुट व उपयुक्त क्षमता 2.71अब्ज घनफुट असणाऱ्या या धरणाला तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हिरवा कंदील दिल्याने या प्रयत्नाला 1981 मध्ये यशही आले. याच दरम्यान, गोंदवले बुद्रुक येथील जेष्ठ कृषी तज्ज्ञ वसंतराव पाटील यांनी या धरणातून माण खटावला पाणी मिळू शकते, याचा सखोल अभ्यास केला. माण तालुका उंचावर असल्याने व बारमाही वाहणाऱ्या नद्या नसल्याने या धरणातून लिफ्ट करून पाणी येऊ शकते व 23 गावांतील सुमारे 40 हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते, असा धाडसी प्रस्ताव 1989 मध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यापुढे मांडला. हा प्रस्ताव मंजूर होताच कृष्णा खोरे पाणी मागणी कृती समिती स्थापन करून या योजनेतून पिंगळी तलावात पाणी सोडून आणखी 11 गावांचा पाणीप्रश्न मिटू शकतो, अशी सुधारित योजनेची मागणीही त्यांनी केली. या सुधारित योजनेलाही मुख्यमंत्री पवार व तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांनी 1992 मध्ये मंजुरी दिलीच. शिवाय या अंतिम सुधारित योजनेत धरणातील एकूण पाणीसाठा क्षमता 9.96 अब्ज घनफुट तर उपयुक्त साठ्याची क्षमता 9.65अब्ज घनफुट करण्यात आली. पाटील यांनी त्यानंतरही या योजनेबाबत कृष्णा खोरे महामंडळाचे तत्कालिन उपाध्यक्ष आमदार मोहनराव उर्फ भाऊसाहेब गुदगे, आमदार विष्णुपंत सोनवणे, आमदार धोंडीराम वाघमारे यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. याचेच फलित म्हणून कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार उरमोडी प्रकल्पाचे काम 2000 पूर्वी पूर्ण होणे गरजेचे असल्याने 1995 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते वडूज येथे या योजनेच्या कालव्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. टप्प्या टप्प्याने या योजनेची कामे पूर्णत्वाकडे गेली. प्रत्यक्षात मात्र या योजनेतून माणला उरमोडीचे पाणी मिळावे यासाठी कृष्णा खोरे पाणी मागणी कृती समितीच्या वसंतराव पाटील, परशुरामशेठ शिंदे, नारायणराव पाटील, नारायणशेठ माने, वाघोजीराव पोळ, भीमराव पाटील, गोविंदराव पोळ यांनी मोठे योगदान दिले.
अखेर उरमोडीचे पाणी माण खटावच्या पाटाने पळू लागले, ते श्रेयवादाचाच रंग घेऊनच. आगामी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांवर छाप पाडण्यासाठी अनेक राजकीय नेते आपापल्या परीने पाणी मीच आणल्याचा दावा करून पाणीपूजनाचे सोहळ्यात दंग झाले आहेत. परंतु, आपण केलेल्या काष्टाचे चीज झाल्याचे पाहण्यासाठी सध्या हयात नसलेल्या वसंतराव पाटील या खऱ्या जलनायकाचा मात्र सर्वानाच विसर पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)