उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती तीनवेळा प्रसिद्ध करणे अनिवार्य

नवी दिल्ली – निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमीची माहिती जाहीर करणे निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे. त्यासंदर्भात आयोगाने बुधवारी जारी केलेल्या आदेशानुसार उमेदवारांना प्रचारकाळात किमान तीन वेळा वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून संबंधित माहितीच्या जाहिराती प्रसिद्धीस द्याव्या लागतील. याशिवाय, राजकीय पक्षांनाही त्यांच्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीविषयीची माहिती त्यांच्या वेबसाईटस्‌वरून द्यावी लागणार आहे. तसे न करणाऱ्या पक्षांची मान्यता काढून घेण्याचा किंवा स्थगित करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.

उमेदवारांनी त्यांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमधून जाहीर करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. उमेदवाराबाबत मतदारांना निर्णय घेता यावा या उद्देशातून तो आदेश देण्यात आला. त्याला अनुसरून निवडणूक आयोगाने पाऊल उचलले आहे. आयोगाच्या आदेशामुळे उमेदवारांना दोषी ठरलेल्या प्रकरणांची आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती त्यांच्या पक्षांना द्यावी लागणार आहे. वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची कात्रणे उमेदवारांना सादर करावी लागतील. तर पक्षांना गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्या उमेदवारांची संख्या नमूद करावी लागेल. गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसणाऱ्या उमेदवारांना त्याविषयीचा उल्लेख करावा लागेल. त्यासाठी उमेदवारांना यापुढे सुधारित अर्ज (क्रमांक 26) भरावा लागेल.

-Ads-

उमेदवारांना त्यांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीविषयीची माहिती असणारी जाहिरात स्वत:च्याच खिशांमधून भरावी लागणार का, ते निवडणूक आयोगाच्या आदेशातून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, संबंधित जाहिराती निवडणूक खर्चाशी निगडीत असल्याने उमेदवारांनाच त्याचा भार उचलावा लागेल, असे आयोगाच्या सुत्रांनी नमूद केले. लवकरच मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोरम आणि तेलंगण राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांच्या प्रचारकाळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आयोगाच्या नव्या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)