पोलिसांकडून आंदोलकांना अटक आणि सुटका
पुणे – उबेर कंपनीला स्टेशन परिसरात उपलब्ध करून दिलेले स्पॉट बुकिंग बेकायदेशीर असून ते बंद करण्यात यावे. याविरोधात बुधवारी आम आदमी रिक्षाचालक संघटनेसह इतर पाच ते सहा संघटनांनी एकत्र येत रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर आंदोलन छेडले. यावेळी मुख्य प्रवेशव्दाराला रिक्षा आडव्या लावून घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून बंडगार्डन पोलिसांनी आंदोलकांना काही वेळासाठी अटक करून सोडून दिले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी स्टेशन परिसरात उबेर टॅक्सी सेवा सुरू केली आहे. यासाठी उबेरला स्टेशन परिसरात जागा उपलब्ध करून देऊन ऑनलाइन तसेच स्पॉट बुकिंग उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बदल्यात उबेर कंपनीकडून 71 लाख रुपये घेऊन 3 वर्षांचा करार देखील करण्यात आला आहे. मात्र, परिवहन विभागाचा (अग्रिकेटर 2017) कायदा लागू झालेला नसताना प्रशासनाने उबेर कंपनीला स्पॉट बुकिंग उपलब्ध करून दिले आहे. स्टेशन परिसरात स्पॉट बुकिंगला परवानगी देणे नियमाच्या विरोधात आहे, असा दावा रिक्षा संघटनांनी केला आहे. याविरोधात आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी तीव्र आंदोलन छेडण्यात आले. यावेळी 50 ते 60 रिक्षा मुख्य प्रवेशव्दाराला आडव्या लावून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. परिसरात गर्दीचे प्रमाण वाढल्याने बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी आंदोलन मागे न घेतल्याने अखेर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी काही वेळासाठी आंदोलकांना अटक केली. तासाभरात त्यांना सोडून देण्यात आले. दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पॉट बुकींगसंदर्भात रेल्वे प्रशासनाला लेखी कळविले आहे. तरीदेखील रेल्वे प्रशासनाने सुरक्षा रक्षक नेमून स्पॉट बुकिंग सुरू ठेवले आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने निर्णय घेऊन बेकायदेशीर उबेर स्पॉट बुकिंग बंद करावी. प्रिपेड रिक्षांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दोन दिवसात पत्रव्यवहार करुन उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे, आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे सहसचिव आनंद अंकुश यांनी सांगितले. आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष आसगर बेग, उपाध्यक्ष गणेश ढमाले, सचिव सुभाष करांडे, सल्लागार श्रीकांत आचार्य, खजिनदार बाबा सय्यद, उपसचिव आनंद अंकुश आदींसह अमर ऍटो संघटना, मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा संघटना, पुणे स्टेशन राष्ट्रवादी रिक्षा संघटनांचे कार्येकर्ते सहभागी झाले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा