‘उपवास’: एक वेगळी ‘उदरभरण’ कला

  सत्‌-असत्‌

एरवी ‘उपवास’ किंवा ‘उपास’ हा शब्द जरी उच्चारला तरी आमच्या पोटात लगेच खड्डा पडतो. त्यामुळे ‘एकादशी’, ‘चतुर्थी’, ‘अंगारकी’ अशा ‘तिथ्या’ आमच्या एकदम नावडत्या आहेत. अशा तिथीच्या दिवशी आमच्या एकट्यासाठी वेगळा स्वयंपाक केलेला असतोच; मात्र त्याशिवाय घरांत ज्यांना उपवास आहे अशांसाठी केलेले उपवासाचे पदार्थही आम्ही आमच्या भोजनाबरोबर चापतो. ‘एकादशी आणि दुप्पट खाशी’ ही म्हण आमच्याबाबतीत तरी नेहमीच सार्थ ठरते. त्यामुळे राजकारणी लोक जेव्हा कोणत्याही कारणासाठी उपोषणाला बसतात त्यावेळी आमचा त्यांच्याबद्दलचा आदर किंचित वाढतोच.

कारण उपवास करणे तसे सोपे नसतेच. महात्मा गांधी जेव्हा उपोषणाला बसत त्यावेळी ते उपोषण चालू असेपर्यंत साधे पाणीदेखील पीत नसत. पण गांधीजींची गोष्टच मुळी वेगळीच होती. कारण ते ‘महात्मा’ होते आणि त्यांनी ब्रिटिशांविरोधी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी उपोषण-अस्त्राचा प्रभावी उपयोग केला होता. त्यामुळे ते उपोषणाला बसणार अशी साधी वार्ता जरी आली तरी ब्रिटिश शासनाला धडकी भरायची. मात्र, आता काळ किती बदलला आहे. मग उपोषण करण्यासाठी आपल्यालाच मिळालेले ‘स्वातंत्र्य’ थोडे घेतले तर बिघडले कोठे? या ‘स्वातंत्र्याचा नाही तरी उपयोग काय?’ म्हणूनच उपोषण करण्यापूर्वी थोडेसे खाण्याचे ‘स्वातंत्र्य’ घेतले तर फार काही बिघडत नाही असे सध्याच्या राजकारण्यांना प्रामाणिकपणे वाटत असेल.

म्हणूनच उपोषणाला बसण्यापूर्वी गरमागरम छोले-भटोरे, सामोसे, बटाटेवडे खाल्ले किंवा उपोषण चालू असतानांच बाहेरच्या बाजूला गुपचूपपणे जाऊन बर्फी, कचोरी असे उपवासाचे पदार्थ खाल्ले तर उपोषणाला थोडाच बट्टा लागणार आहे? त्यामुळे इतरांना विशेषतः विरोधकांना पोटात दुखायचं कारणंच काय ? पण मेले विरोधक जणू टपूनच बसलेले असतात. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत ‘विरोध’ करायची सवय झालेली असते.

खरे तर प्रत्येक राजकारणी हा ‘गोड’ बोलत असतो (याला काही अपवाद असतीलही म्हणा) त्यामुळे बहुतेक राजकारणी लोकांना ‘डायबेटीस’ असतो आणि रिकाम्या पोटी उपोषणाला बसणे म्हणजे साक्षात उपोषणस्थळी अँब्युलन्सला ‘निमंत्रण’ देणे असते हे सर्वांनाच माहित असते. त्यामुळे उपोषणाला बसण्यापूर्वी सत्तारूढ काय किंवा विरोधी पक्षांचे काय संगळ्यांनाच थोडे तरी खाद्यपदार्थ तोंडात टाकून यावेच लागते. उपोषणाला बसण्यापूर्वी प्रामाणिकपणे काहीच नाही खाल्ले तर उपोषणाऐवजी ‘वेगळीच बातमी’ गाजायची अशी सर्वांनाच भीती असते. त्यामुळे खरे तर याप्रकरणात ‘आळी-मिळी-गुपचिळी’ प्रमाणे सर्वांनीच उपवासाची कचोरी खाल्ल्याप्रमाणे आपले तोंड बंद ठेवणे सर्वांच्याच फायद्याचे असते. पण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची सवय असल्यामुळे तसे होत नाही. स्वतःच्या तोंडात उपवासाची कचोरी ठेवून विरोधकांनी उपोषणाच्या वेळी कचोरी खाल्ल्याचा हमखास आरोप केला जातो.

शिवाय हल्लीचा जमाना ‘इन्स्टंट’ चा आहे. त्यामुळे पक्षाचा आदेश आला की केव्हाही उपोषण करावेच लागते. अनेकदा विरोधी पक्षांनी केले म्हणून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी उपोषण करावे लागते अशावेळी ‘इन्स्टंट उपोषणा’चा मार्ग अवलंबण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यासाठी ‘इन्स्टंट फूड’ तयार ठेवावे लागतेच कारण ‘इन्स्टंट फूड’ खाल्ल्‌याशिवाय ‘इन्स्टंट उपोषण’ कसे यशस्वी होणार? पक्षश्रेष्ठींना देखील याची आधीच कल्पना आलेली असते त्यामुळे ‘इन्स्टंट उपोषण’ करण्याच्या आदेशाबरोबरच ते त्या ‘इन्स्टंट उपोषणासाठी काही मौलिक सूचनाही पाठवितात. त्यामध्ये उपोषणाआधी ‘इन्स्टंट फूड’ खाताना ‘सेल्फी’ काढू नये तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना उपोषणस्थळी फिरकू देऊ नये. उपोषणास बसल्यावर तोंड चघळू नये कारण उगाचच कोणालाही काहीही शंका येऊ शकते. नाही म्हणायला, उपोषणास बसल्यानंतर साधारण तासा-दोन तासाने जवळच कोठे बैठक वा अन्य कार्यक्रम असले तर तेथे आवर्जून जाऊन गुपचूपपणे तेथील ‘मेन्यू’चा आस्वाद घ्यायला हरकत नाही परंतु त्यासाठीही वरील सूचनांचे तंतोतंत पालन केलेले बरे नाही तर आणि त्यामुळे उपोषणाचा ‘फज्जा’ उडाल्याची बातमी येऊ शकते.

ते बिचारे अण्णा हजारे किती भोळे म्हणावे लागतील त्यांना यातील एकही गोष्ट माहीत नाही म्हणून बरे नाही तर त्यांनी कित्येक दिवस उपोषण चालू ठेवून आपल्या मागण्या सरकारकडून सहज मान्य करून घेतल्या असत्या. शेवटी ‘उपवास’ म्हणजे देखील एक उदरभरणाची वेगळी कला आहे हे यानिमित्ताने राजकारण्यांनी दाखवून दिले आहे. त्याबद्दल त्यांना ‘सलाम’च केला पाहिजे.

– सत्यश्री


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)