उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये मोर्चेबांधणी

वडगाव-कातवी नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीने अनेकांनी धडकी भरली. सर्वपक्षीयांनी मोट बांधत पंचवीस वर्षे कमळ फुललेल्या भारतीय जनता पक्षाला धक्‍का दिला. या निवडणुकीत मयूर ढोरे यांनी बाजी मारत पहिला लोकनियुक्‍त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. निवडणुकीनंतर उपनगराध्यक्षपदाकरिता भाजप-राष्ट्रवादीमध्ये कमालीची चुरस निर्माण झालेली दिसते. निवडणूक होऊन तीन आठवडे उलटले; तरी उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम अद्यापही जाहीर झालेला नाही.

राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप विरोधकांकडून समविचारी पक्षांशी हातमिळवणी करा आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा अजेंडा प्रखरपणे राबविला गेला. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आपल्या समर्थकांसह सामील झालेले पंढरीनाथ ढोरे यांना भाजपने ऐनवेळी कात्रजचा घाट दाखवला आणि पंढरीनाथ ढोरे यांनी वेगळी चूल मांडली. मात्र त्यांचे काही समर्थकांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढविली. पंढरीनाथ ढोरे, भाजपचे भास्करराव म्हाळसकर आणि सर्वपक्षीयांकडून मयूर ढोरे यांच्यातील लढतीमध्ये मयूर ढोरे 910 च्या मताधिक्‍यांनी वरचढ ठरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडगाव-कातवी नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (सर्वपक्षीय) सात, भाजपचे सात आणि अपक्ष दोन आणि मनसेचा एक असे 17 सदस्यीय पक्षीय बलाबल आहे. भाजपचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हाळसकर यांना पराभवाची चव चाखावी लागली आणि मावळ तालुक्‍यात 25 वर्षे भाजपचे आमदार, पंचायत समितीवर सभापती, बाजार समिती, लोणावळा आणि तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाजपचा असे सारे उपयुक्‍त वातावरणाचा फायदा झाला नाही. जिल्हाध्यक्षांच्या तालुक्‍यात भाजपला हारकिरीचा सामना करावा लागला आहे; परंतु सात सदस्य निवडून आल्याने “भाजप चमू’ला दिलासा मिळाला आहे.

आता उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडे समान जागा आहेत. उर्वरित तीन जागा या भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक-एक बंडखोर आहे. तसेच एक जागा मनसेकडे आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये दोन्ही पक्षांना समान संधी असल्याची स्थिती आहे. राजकीय घडामोडी कोण वरचढ ठरतो, तोच उपनगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान होईल. विशेष म्हणजे दोन अपक्ष कुणाच्या वळचणीला जाणार हे अद्यापही अनिश्‍चित आहे. दोन अपक्ष आणि मनसेच्या एका मतावर उपनगराध्यक्षपदाची सर्व गणिते अवलंबून आहेत.

चुरशीच्या लढाईमध्ये आमदार बाळा भेगडे यांच्यासाठी प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत नगरसेवक पदाच्या निम्म्याहून अधिक जागांवर पराभवाची नामुष्की ओढावली. सर्वपक्षीयांची सरशी आणि भाजपची पिछेहाट हाच मावळच्या निकालाचे विश्‍लेषण होत आहे. पण तरीही आता उरलीसुरली वाचविण्यासाठी उपनगराध्यक्षपद मिळवण्यासाठी आमदार भेगडे यांच्यासह त्यांच्या “टीम’ला प्रयत्नशील राहतील. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसला बळ मिळण्याची संधी स्थानिक नेतेमंडळी सोडणार नाहीत, त्यामुळे अपक्ष आणि मनसेला पाठिंबा मिळविण्यात कोण यशस्वी ठरतो, त्याकडे वडगावकरांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)