उपनगरांमध्ये शुकशुकाट

उपनगर टीम – क्रांती दिनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदास उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी, चिंचवड, थेरगाव, आकुर्डी, निगडी, भोसरी, दिघी, बोपखेल या परिसरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालय, कार्यालये, दुकाने, उद्योग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्व काही बंद होते.
ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. चौका-चौकात आंदोलन समर्थक ठिय्या मांडून बसले होते. व्यापारी वर्गाने या आंदोलनास प्रतिसाद देत आपले व्यवसाय बंद ठेवले होते. यामुळे एरव्ही गजबजलेल्या रस्त्यांवर देखील शुकशुकाट दिसत होता.
सर्व पक्षीय सहभाग

भोसरी- भोसरीच्या पीएमटी चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. भोसरी परिसरातील सर्व दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. आंदोलक दुचाकी वाहनांवरुन फिरुन घोषणा देत होते. या परिसरातील बंद पूर्णपणे शांततेच्या वातावरणात पार पडला. भोसरीत आंदोलनामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘आयटी’ नगरीत कडक बंदोबस्त
वाकड- आयटी नगरी हिंजवडी व आयटीयन्सचे वास्तव्य असलेल्या वाकड परिसरात बंदचा परिणाम दिसून आला. या परिसरात देखील नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. हिंजवडी येथील विप्रो चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. आयटी हब म्हणून जगाच्या पाठीवर आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. भारतीय सणा-वारांना देखील सुट्टी न घेणाऱ्या शेकडो लहान-मोठ्या आयटी कंपन्या गुरुवारी मात्र बंद होत्या. आदल्या दिवशीच व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती पाहूनच कामावर येणाच्या सूचना दिल्या होत्या. येथे येणारा मोठा कर्मचारी वर्ग हा कॅबने येतो, परंतु आंदोलन असल्याने खासगी वाहतूक व्यवस्था देखील बंद होती. यामुळे बहुतेक आयटीयन्सने घरी राहणेच पसंद केले. एरव्ही आयटी प्रोफेशनल्स गजबजलेला असणारा हा परिसर अगदीच शांत आणि निर्मनुष्य भासत होता.

निगडी चौकात घोषणाबाजी
निगडी – टिळक चौकातील कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाखाली गुरुवारी मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मराठा बांधव हातात भगवा झेंडा घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षणाची मागणी करत होते. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवजी अशा घोषणा देऊन आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी करत होते. या ठिकाणी पोलिसांनी आदल्या दिवशीपासूनच कडक बंदोबस्त ठेवला होता .पोलीस आंदोलकांना बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत होते. आंदोलकांनी त्यांच्या आंदोलनाला कोणतेही गालबोट लागू न देता गुरुवारचा बंद आणि आंदोलन यशस्वी रित्या पार पाडले. निगडीमध्ये सर्व दुकने बंद ठेवण्यात आली होती. प्रचंड वर्दळ असलेला निगडी चौकातील परिसरात गुरुवारी मात्र सामसूम होती. सर्व प्रकारचे व्यवहार बंद होते. तळवडे, ज्योतिबानगर या औद्योगिक परिसरातील सर्व लहान-मोठे उद्योग बंद असल्याने नेहमीच वाहतूक कोंडीत अडकलेला तळवडे-चाकण रस्ता पूर्णपणे शांत होता.

सांगवी, पिंपळे गुरवमध्ये शंभर टक्‍के बंद
सांगवी – मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगवी, पिंपळे गुरव परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. पिंपळे गुरव परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष मोहनलाल चोधरी, संतोष पोडवाल राम चोधरी, पोरे भाई यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुनी सांगवी, नवी सांगवीमधील व्यापाऱ्यांनीही दुकाने, हॉटेल बंद ठेवत संपाला पाठिंबा दिला. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरळीत सुरू होत्या. पिंपळे गुरवमधील रामकृष्ण मंगल कार्यालय चौकात किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीतील मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करुन महाराष्ट्र बंदमध्ये आपला सहभाग नोंदविला.

यावेळी राष्ट्रवादी काॅँग्रेसच्‍या वतीने दुचाकी रॅली काढण्यात आली. यात माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अमरसिंग आदियाल, शिवाजी पाडुळे, शाम जगताप सहभागी झाले हाेते.

रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये शांतता
रहाटणी – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वाधिक उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर परिसरातील नागरीक आणि व्यापारी वर्गाने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या परिसरातील सर्व दुकाने बंद होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसराला एकप्रकारे छावनीचे स्वरुप आले होते. परंतु दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने बंद शांततेत पार पडला.

मजूर अड्डाही शांत
जुनी सांगवी येथील मजूर अड्डयावरही गुरुवारी शांतता होती. एरव्ही रोज सकाळी येथे खूप मोठ्या प्रमाणात मजूर जमतात. दहा-अकरा वाजेपर्यंत वेगवेगळे ठेकेदार, नागरीक वेगवेगळ्या कामासाठी मजुरांना घेऊन जातात. परंतु आजचे चित्र वेगळे होते. मजूर अड्डयावर नेहमीप्रमाणे मजूर जमले आणि काही वेळातच आज बंद असल्याचे कळल्यावर परतले. महिला मजूर काही वेळ तिथेच बसून होत्या परंतु रोजप्रमाणे त्यांना रोजगार मिळाला नाही आणि त्या देखील रिकाम्या हाताने दुपारी आपआपल्या घरी परतल्या.

खेळ मांडला…
दर रविवारी खेळांच्या मैदानांवर गर्दी होते. परंतु गुरुवारी बंद मुळे शाळा, महाविद्यालये, कारखाने आणि कार्यालये बंद असल्यामुळे उपनगरातील सर्व खेळाची मैदाने लहान मुले आणि तरुणांमुळे फुलली होती. ठिकठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस रंगत होत्या. रविवारपेक्षाही अधिक गर्दी गुरुवारी मैदानांवर पहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने उघडीप दिली असल्यामुळे मैदानांमध्ये चिखल नव्हता आणि ढग दाटलेले असल्यामुळे ऊनही नव्हते. सुट्टी आणि अनुकूल वातावरणाचा फायदा घेत मुलांनी खेळाचा आनंद घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)