उपनगरांमध्ये खासगी बसची घुसखोरी

पिंपरी उपनगर टीम – शहर व उपनगर परिसरात बेकायदेशी वाहतूक आता जवळपास बेलगाम झाली आहे. केवळ सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांची कसून तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलीस विभाग आणि आरटीओने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस आणि अन्य वाहनांकडे सपशेल डोळेझाक करत आहेत. त्यातच अलीकडेच झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप खासगी वाहतुकदारांच्या जणू काही पथ्यावरच पडला आहे.

लांब पल्ल्याची खासगी बसने मुख्य मार्गावर थांबून प्रवाशांना सुविधा देणे स्वाभाविक आहे परंतु आता या खासगी बस जास्त प्रवासी आणि जास्त नफ्याच्या हव्यासापोटी लहान-लहान रस्ते असलेल्या उपनगरांमध्ये घुसू लागल्या आहेत. निगडी पवळे पूल, नाशिक फाटा अशा ठिकाणी ऐन वर्दळीच्या वेळी या खासगी बसचा थांबा त्रासदायक ठरत आहे. काही उपनगरांमध्ये तर खासगी बस ऑपरेटर्सने आपल्या ठिय्याच मांडलेला आहे. दिवसभर परिसरात बस पार्क केल्या जातात आणि सायंकाळी येथूनच भरल्या जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा दुसऱ्या फेरीच्या बस हजर असतात. सरकारी रस्त्यांवर, सरकारी जागेत, पुलाखाली या व्यावसायिक बसेसच फुकट पार्किंग सुरु आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहतूक कोंडीचे कारण
शहरातील अगदी लहान-लहान उपनगरे आता खासगी बसचा अड्‌डा बनली आहेत. सायंकाळ होताच महामागाच्या शेजारील दापोडी ते निगडी आणि नाशिक फाटा ते भोसरीपर्यंत सर्वत्र खासगी बसचे डझनभर थांबे वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहेत. दुसरीकडे महामार्गांपासून दूर असलेल्या आंतरिक भागातील गावांमध्ये देखील खासगी बसची घुसखोरी वाढू लागली आहे. नवी सांगवी परिसरात सायंकाळच्या वेळी किमान दोन डझनहून अधिक खासगी बस प्रवेश करतात. तर काही बस दिवसभर मोकळ्या मैदानात रस्त्याच्या कडेला उभ्या असतात. आधीच लहान असलेले रस्ते आणि चौकांचा या बसेसमुळे श्‍वास कोंडत आहे. रोज सायंकाळी सहा नंतर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसाठी खासगी बसच्या लांबच्या लांब रांगा येथे लागताना दिसत आहेत. चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहापासून ते चापेकर चौकापर्यंत रोज सायंकाळी या खासगी बसमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसेच आकुर्डी, खंडोबा माळ, थेरगाव या भागात देखील दिवसें-दिवस खासगी बसचा त्रास वाढतच चालला आहे.

भीती कुणाची नाही
सांगवी परिसरात रोज सायंकाळी वर्दळीच्या दोन-अडीच या खासगी बसचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार कुणाकडे करावी, असाही प्रश्‍न आता नागरिकांना पडला आहे. कारण या थेट सांगवी पोलीस ठाण्याची वाट अडवून उभ्या असतात. जर या बस मालक आणि चालकांचे एवढे धाडस होत असेल तर नक्‍कीच यांना मोठे पाठबळ लाभले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे आणि कुणीच या विरोधात आवाज उठवत नाही. पीडब्लुडीचे मैदान, साई चौकाचा रस्ता जिकडे तिकडे खासगी बस उभ्या असतात. या लहानशा गावात आणि दाट लोकवस्तीत जिथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एसटी बस येऊ शकत नाही, तिथे खासगी ट्रव्हॅल्सच्या बसला परवानगी कशी काय मिळते असा सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.

भोसरीतील रस्त्यांवर अवैध पार्किंग
भोसरीतील कित्येक प्रमुख रस्त्यांवर खासगी बसने कब्जा केला आहे. जणू काही हे रस्ते या बसमालकाचे अधिकृत पार्किंग असल्याप्रमाणे येथे खासगी बस पार्क केल्या जात आहेत. यामुळे बऱ्याचदा वाहतुकीसाठी अर्धा रस्ता देखील शिल्लक राहत नाही. यामुळे वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचा धोका देखील वाढला आहे. वाहतूक पोलीस विभाग मात्र बघ्याचीच भूमिका घेत असल्याचे स्थानिक रहिवाश्‍यांची तक्रार आहे. भोसरी परिसरात नोकरदार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. बहुतांश लोक हे मराठवाडा, विदर्भ येथून रोजगारासाठी आले आहेत. पण नेहमीच आपल्या मूळगावी जावे लागत असल्यामुळे खासगी बस मालकांनी भोसरीला बसअड्‌डा बनविला आहे. त्यामुळे लातुर, उस्मनाबाद, बीड , सोलापूर, वाशीम, जळगाव, धुळे अशा विविध ठिकाणी जाण्यासाठी रोज संध्याकाळच्या वेळेस अनेक कंपनीच्या ट्रॅव्हल्सच्या बस येथून सुटतात व सकाळी पुन्हा येथे बस येऊन उभ्या राहतात. दिवसभर त्या येथेच मुक्‍कामाला असतात. लांडेवाडी चौकापासून राजमाता जिजाऊ महाविद्यालयाजवळील नाशिक महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील रस्ते, धावडेवस्ती जवळील रस्ता तर साईसागर हॉटेल समोरील रस्ता असे आहेत. याच मार्गांचा भोसरीतील नागरीक मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सकाळी दहा व सांयकाळी सहा वाजता या रस्त्याने जाणे म्हणजे मोठी कसरतच ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)