उपचार सरकारी रूग्णालयात; अन्‌ औषध बाहेरून घ्या…

बावडा– बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज 120 ते 150 बाह्यरुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या रुग्णांची नोंदणी (केसपेपर काढणे) व तपासणीनंतर औषधे देणे ही दोन्ही कामे एकट्या औषधनिर्माण अधिकाऱ्याला करावी लागतात. तसेच विविध आजारांसाठीची औषधेही जिल्हास्तरावरून वेळेत मिळत नसल्याने उपचार सरकारी रूग्णालयात आणि औषध बाहेरचे, अशी स्थिती असून रुग्णांवर महागडी औषधे घेण्याची वेळ येत आहे.
जिल्हा प्रशासनाकडे स्थानिक प्रशासनाकडून औषधांची मागणी केली असता आमच्याकडून तर आम्ही देऊ परंतु, साठा शिल्लक नसल्याने सध्या रुग्णकल्याण समितीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर जेवढे शक्‍य होईल तेवढी औषधे खरेदी करावीत. आमच्या उपलब्ध झाल्याबरोबर पाठवण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बावडा (ता.इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 9 उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्रांमध्ये आवश्‍यक कर्मचारी नसल्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागत आहे. येथे एका वैद्यकीय अधिकाऱ्याबरोबरच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आवश्‍यक तेवढे उपलब्ध नाहीत. तर पिंपरी बु. व वडापूरी येथील उपकेंद्रामध्ये एकही आरोग्य सेवक व सेविका नाही.
गेल्या चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरती झालेली नाही. काही कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाल्याने येथे कर्मचारी कमी पडू लागले आहेत. बावडा आरोग्य केंद्र हे तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर असल्याने दूरचे कर्मचारी येथे काम करण्यासाठी यायला तयार होत नाहीत, त्याचबरोबर गेल्या चार ते पाच वर्षांपासून नवीन नोकर भरती झाली नसल्याने देखील कर्मचारी अपूरे पडत आहेत, असे तालुका आरोग्य अधिकारी डा.सुरेखा पोळ यांनी सांगितले.

  • गटविकास अधिकारी व्यस्तच…
    बावडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदांचा पुरवठा पंचायत समितीच्या माध्यमातून केला जातो.त्यासाठी येथी अधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अनेकदा मागणी केली पण उद्या देऊ, परवा देऊ असे करीत एक वर्ष उलटले तरी त्यांचा उद्या उजडलेला नहीा. याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला परंतु, ते इतके व्यस्त होते की त्यांचा फोन दिवसभर व्यस्तच लागत होता.
  • प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असताना एकट्यावरच सर्व भार पडतो. एका अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तातडीने आवश्‍यकता आहे. निवासी काम करताना निवासाची सोय नाही. खोल्या पावसात गळतात, अशा अनेक अडचणीतूनही रुग्णांना चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
    कपिलकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी, बावडा
  • जिल्हा आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष…
    बावडा (ता.इंदापूर) येथे कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाचे काम चार वर्षांपासून चालू आहे. यामुळेच आरोग्य केंद्राकडे जिल्हा स्तरावरुन दुर्लक्ष होत असावे, असा सूर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह जनतेतून आहे. ग्रामीण रुग्णालयाचे काम कधीही पूर्ण होवो पण सध्या चालू स्थितीत असलेल्या आरोग्य केंद्रावर प्रशासनाचे दुर्लक्ष असणे ही गंभीर बाब असून जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाला कधी जाग येणार, असा सवाल केला जात आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)