उन्हाळ्यात रक्तदान करण्याबाबत अनेक गैरसमय

बिबवेवाडी – खरं तर पुणे तेथे काय उणे अशी म्हण आहे. परंतु प्रत्येक उन्हाळ्यामुळे “पुणे तेथे रक्त उणे’ अशी म्हणायची वेळ येत आहे. पुणे शहरामध्ये उन्हाळामुळे रक्ताचा तुटवडा जाणवत असून याच काळात सर्वात जास्त कमी भासत आहे. उन्हाळ्यात रक्तदान केल्याने आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो व उष्णतेचे प्रमाण जास्त जाणवत असल्याने रक्तदान केल्यास आपली तब्येत खालावेल असा गैरसमज अनेक नागरिकांमध्ये दिसून येतो. त्यामुळे रक्तदान शिबिरांकडे नागरिक पाठ फिरवतात. हे रक्तपुरवठा कमी होण्याचे एक मुख्य कारण दिसून येते.
रक्ताच्या तुटवड्याचे दुसरे कारण म्हणजे रक्त पेढ्यांचा मोठा स्तोत्र म्हणजे महाविद्यालयीन तरूण-तरुणी हाच असतो. मात्र जवळपास सर्वच महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्याने हा स्तोत्रही फारच कमी झाला आहे. बहुतांश रक्तदाते हे महाविद्यालयीन युवावर्ग असतो. पुण्यात बाहेर गावांवरून शिक्षण घेण्यासाठी येणारे विद्यार्थीच जास्त आहेत. ते परीक्षा संपल्यामुळे आपापल्या गावी सुट्ट्यांसाठी जातात. त्यामुळे देखील रक्ताचा तुटवडा भासत असतो. तसेच उन्हाळी सुट्टीत रक्तदान शिबिरांचीही संख्या कमी असल्याने दरवर्षी मे महिन्यात अशी परिस्तिथी निर्माण होते. यामुळे ठरलेल्या शस्त्रक्रीयांवर याचा मोठा परिणाम होतो.
रक्ताचे नाते ट्रस्टतर्फे रक्तदानाची मोठी चळवळ राबिवली जात असून या मार्फत जास्तीत जास्त नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करण्यात येते. तसेच गरजू रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध करून देण्यासही हि संस्था मदत करते. उन्हाळा असल्यामुळे नागरिक रक्तदान कमी प्रमाणात करीत असून गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्ताचे नाते या संस्थेचे राम बांगड यांनी केले आहे. बांगड म्हणाले की सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे रक्तदान मानले जाते. परंतु रक्तदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच सर्व ब्लड बॅंकांनी आपापसात संवाद ठेवणे गरजेचे आहे. रक्तदात्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

जनजागृती आवश्‍यक

डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात देखील इतर ऋतूंप्रमाणेच रक्तदान केल्यानंतर काही काळातच पुन्हा नवीन रक्त आपल्या शरीरात तयार होते. परंतु त्यात जनजागृती करून लोकांचा गैरसमज दूर करण्याची नितांत आवश्‍यकता आहे. नागरिकांनी आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, शुभ कार्य हे रक्तदान करून साजरे करण्याची नवीन पद्धत सुरू करणे गरजेचे आहे. इतकेच काय तर इतर प्रसंगी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे होणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)