उन्हाळ्यातील आहार-विहार

वसंत ऋतू संपताच उन्हाळा सुरू होतो व सूर्याचे तीव्र किरण व कडक ऊन पडते व त्यामुळे मनुष्य, पशु-पक्षी, वनस्पती व पृथ्वी ह्या सर्वांमधील ओलसरपणा शोषला जाऊ लागतो. म्हणून ह्या ऋतूत मनुष्याची शक्‍ती क्षीण होऊ लागते.

उन्हाळा हा भारतातील सर्वांत मोठा अर्थात जास्त दिवस राहणारा मोसम आहे. भारतात कित्येक ठिकाणी 8-10 महिने उन्हाळा असतो. तसे पाहिले तर ऋतू विचाराच्या दृष्टीने चैत्र ते आषाढ (एप्रिल ते जुलै) हा काळ उन्हाळ्याचा ऋतू मानला जातो. मैदानी भागात मे, जून महिन्यांत फार कडक उन्हाळा असतो. उन्हाळ्याचा ऋतू आरोग्यावर सर्वांत जास्त हानिकारक परिणाम करतो, म्हणून ह्यासंबंधी विशेष माहिती करून घेणे इष्ट आहे.

उन्हाळ्यात पाचक अग्नी फार मंद असतो म्हणून सकाळी जेवणात जड, पाच्य व अजीर्णकारक पदार्थ मुळीच खाऊ नयेत. हलके, ज्यामुळे शरीर थंड राहील, असे पदार्थ प्रमाणशीर खावेत. नेहमीच्या जेवणाचे प्रमाणही कमी ठेवावे व मांस शक्‍यतो बिलकूल खाऊ नये.

सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर एक ग्लास चांगली थंडाई, दूध िंकंवा दह्याची लस्सी अथवा जव किंवा चण्याचे, सत्तूचे पीठ पाण्यात कालवून साखर घालून प्यावे, वाळा (खस) किंवा चंदनाचे सरबत घ्यावे. ते सुगंधी व गुणांनी उत्तम असते. अर्धापाव वाळा किंवा चंदनाचे चूर्ण एक शेर पाण्यात बारा तास भिजू द्यावे, त्यानंतर चांगले कुसकरून गाळून घ्यावे, ह्या गाळलेल्या पाण्यात तीन शेर साखर किंवा खडीसाखर व जरूरीप्रमाणे पाणी मिसळून ठेवावे. ह्याचे चार बाटल्या सरबत घरीच तयार होऊ शकते. हे कच्चे सरबत 10-15 दिवस खराब होत नाही.

सकाळच्या पेयांत नीरा (ताड किंवा खजुराच्या झाडांपासून निघणारा रस) फार आरोग्यदायक असतो. नारळाचे पाणी, ऊस किंवा संत्र्याचा ताजा रस सुद्धा उत्कृष्ट पेय आहे. राजस्थानातील लोक जवाचे पीठ ताकात मिसळून बार्लीसारखे पातळ पाणी करतात व दुसरे दिवशी शिळे झाल्यावर ताकाबरोबरच पितात. हे पेय सुद्धा उन्हाळ्याच्या त्रासापासून बचाव होण्यासाठी चांगले आहे. मद्रासकडे लोक सकाळच्या जेवणात थंड भात व चिंचेचे पाणी पितात. शिळा भात व चिंच हे जेवण म्हणून नेहमी घेतले तर आरोग्यासाठी हानिकारक असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेच्या विकारांपासून रक्षण करण्याच्या दृष्टीने वाईट नाही.

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात उत्तम भात, पातळ वरण किंवा कढी, दही अथवा ताक अवश्‍य घ्यावे. जे केवळ भातावर राहू शकत नाहीत त्यांनी जव किंवा गव्हाची पोळी थोड्या प्रमाणात खावी. दिवस मोठा असल्याने दुपारनंतर ह्या दिवसांत थोडी भूक लागते, त्यावेळी फुटाणे किंवा सातू खाऊन थंड पाणी पिणे हितकारक असते. शक्‍य असेल त्या लोकांनी फळे अथवा फळांचा ताजा रस घ्यावा.

रात्रीच्या जेवणात पोळी, पालेभाजी, कांदा, पुदिना किंवा कोथिंबिरीची चटणी असावी. उन्हाळ्यात कच्चा कांदा खाणे फार गुणकारी असते. आपल्या देशातील शेतकरी व मजूर केवळ कांदा भाकर खाऊन उन्हात काम करून सुद्धा निरोगी असतात.

ह्या ऋतूत आंबा फळ खाणे फार चांगले. कलमी आंब्यात मगज जास्त असतो म्हणून तो पचावयास जास्त वेळ लागतो, पण चोखून खाण्याच्या लहान आंब्यात रस पातळ असतो. तो पचनशक्‍ती वाढवून शरीर पुष्ट करतो. दुधाबरोबर आंब्याचा रस घेतला असता शरीराचे वजन व शक्‍ती वाढते.

उन्हाळ्यात चहा पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. अनिवार्यच असेल तर फार थोडा प्यावा. ह्या दिवसांत दूधसुद्धा थंड करून प्यावे. उन्हाळ्यात स्नायूमंडळ बरेच अशक्‍त असते म्हणून मद्यपान मुळीच करू नये. कारण मद्याने स्नायूंवर ताण पडातो. दारू पिण्यावाचून ज्यांचे भागतच नाही त्यांनी जास्त पाणी घालून थोड्या प्रमाणात मद्य प्यावे, नाहीतर अंगावर सूज, सुस्ती व बेशुद्धी येते. तसेच कधी कधी स्नायूमंडळावर घातक परिणाम होतो. ह्या दिवसांत स्त्रीसंभोग अति हानिकारक आहे. त्यामुळे शारीरिक व मानसिक दुर्बलता वाढते.

इंग्रजांनी राज्यकारभारासाठी युरोपप्रमाणे भारतातसुद्धा दैनिक कामांसाठी सर्व ऋतूत एकच वेळ प्रचलित केली. सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 4-5 वाजेपर्यंत दुपारभर काम करणे उन्हाळ्यात कदापि चांगले नाही. ग्रीष्म ऋतूतच काय, आपल्या देशाच्या हवामानाकडे पाहता मार्च ते ऑक्‍टोबरपर्यंत म्हणजे वर्षातून 8 महिने दैनिक कामाच्या वेळेची विभागणी सकाळी 7 ते 11 पर्यंत, मध्यान्ह भोजनोपरांत 3 वाजेपर्यंत विश्रांती व मग संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत काम, असे असले पाहिजे, अशा प्रकारचे वेळेचे विभाजन विशेषत: ग्रीष्म ऋतूत भारतीय जनतेकरता आरोग्यवर्धक व अनुकूल होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)