उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ‘भडका’

संग्रहित छायाचित्र.......

रोज एक आग ः नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

पिंपरी – दरवर्षी शहरात उन्हाळ्यात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढतात. यावर्षी उन्हाळ्याच्या अगदी सुरुवातीलाच आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची दिसून येत आहे. गेल्या एका आठवड्यात सुमारे आठ ते दहा लहान-मोठ्या आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. गॅस गळती, कचऱ्याला आग या घटना देखील गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये वाढल्याचे समोर आले आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यत दोन दिवसांमध्ये आगीच्या चार घटना घडल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि.22) व शनिवारी (दि.23) अशा 24 तासात काळेवाडी, रहाटणी, भोसरी एमआयडीसी व दिघी अशा चार ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काळेवाडी येथे शॉर्ट सर्किटमुळे शुक्रवारी (दि.22) पहाटे महिंद्रा झायलो (एमएच 14 बीए- 6464) या कारने अचानक पेट घेतला. याची वर्दी उमेश गुंड यांनी पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रास दिली. त्यानुसार चिखली उपकेंद्र आणि मुख्यालयातून प्रत्येकी एक बंब काळेवाडीतील घटनास्थळी दाखल झाला. या आगीत गणेश वायभट (वय-21) आणि योगेश वायभट (वय-23) हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांना पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे पोलिसांनी सांगितले. आगीत कार पूर्णपणे खाक झाली.
त्यानंतर शनिवारी (दि.23) पहाटे पावणे एकच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील विश्‍वेश्‍वर चौकातील “थ्री टेक’ कंपनीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यामध्ये कंपनीतील साहित्य जळून खाक झाले आहे. घटनास्थळी भोसरी आणि पिंपरी अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी 20 मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेबरोबरच रहाटणी येथील गंगानगर परिसरातील हार्डवेअरचे गोदाम आगीत जळून खाक झाले. ही घटना शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामी समर्थ मठाच्या जवळ असलेल्या हार्डवेअरच्या गोदामाला आग लागल्याने अग्निशामक मुख्यालयातून प्रत्येकी बंब रवाना झाला. या आगीत गोदाम जळून खाक झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या तीन घटनांनंतर दिघी येथील पोलाइस पॅनोरमा या बारा मजली इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. वर्दी मिळताच घटनास्थळी चिखली, भोसरी आणि पिंपरी येथील तीन अग्निशामक मुख्यालयातून तीन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. या आगीवर दहा मिनिटात नियंत्रण मिळविण्यात यश आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. आगीत घरातील साहित्य खाक झाले.
सुदैवाने या चारही घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. नागरिकांनी घर किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आगनियत्रंणासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी तसेच विद्युत तारा व इतर विद्युत उपकरणे ही वेळोवेळी दुरुस्त करावीत असे आवाहन अग्निशामक दलाच्यावतीने करण्यात आले आहे. उन्हाळ्यात अनेक वीज उपकरणे सुरू असतात. तसेच ओव्हरलोड होत असल्याने जुन्या आणि कमी क्षमतेच्या वायर वितळतात. यामुळे शॉर्ट-सर्किट होण्याचे प्रकार होतात. यातून मोठी आग लागण्याचे प्रकार घडतात. यामुळे उन्हाळ्यात विद्युत तारा व विद्युत उपकरणांची काळजी घेणे गरजेचे असल्याचे अग्निशमन विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रताप चव्हाण यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)