उन्हाळ्याच्या झळा…

ताम्हणवाडीचा तलाव कोरडा पडल्याने शेतकरी चिंतेत

नांदुर, दि. 17 (ता. दौंड) – डोंगर पायथ्याशी असलेल्या ताम्हणवाडी या गावात फेब्रुवारी महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. येथील बंधारे कोरडे पडले असल्याने कृषी पंपही मोकळे झाले आहेत. अर्थातच त्यामुळे रब्बी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. या वर्षी परतीचा पाऊस तसा कमी झाला, त्यामुळे ताम्हणवाडीतील विहिरी देखील कोरड्या पडू लागल्या आहेत. येथील तलावात 30 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने ताम्हणवाडीकरांना उन्हाळा त्रासदायक ठरणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मेंढपाळांनी देखील या भागाकडे पाठ फिरवली आहे. येथील बंधाऱ्यात काही शेतकऱ्यांनी पाण्यासाठी विहिरी घेतल्या आहेत. रब्बी पिकांना शेवटचे एक-दोन पाणीही आता कमी पडू लागले. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. येथे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्‍न मोठा आहे. उन्हाळा सुरू झाला आणि पाणी टंचाई सुरू झाली की, शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागत आहे, तसेच जनावरांसाठी खाद्यही बाहेरूनच आणावे लागते. सध्या तर शेतात पीक केले तरी त्याला बाजार नाही, अशी स्थिती आहे. पुढील तीन महिन्यांचा तीव्र उन्हाळ्याचा काळ कसा जाणार, या चिंतेने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत आहे. ताम्हणवाडी तलाव व बंधारे फक्त पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असल्याने शेतीला पाणी मिळावे, ही गावकऱ्यांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)