उन्हाळी सुट्ट्यांची चोरट्यांनी साधली संधी

पुणे – उन्हाळी सुट्टयांचा हंगाम सुरु झाल्यानंतर चोरटे सक्रीय झाले आहेत, सुट्टयांच्या निमित्ताने अनेक कुटुंबे बाहेरगावी जातात. हीच संधी चोरट्यांनी साधण्यास सुरुवात केली असून दर दिवसाला शहरात आणि उपनगरात तीन ते चार ठिकाणी घरफोड्या होत आहेत. या घटना प्रामुख्यांने सोसायट्यांमध्ये घडत आहेत, विशेष म्हणजे चोरटे भरदिवसाच या घरफोड्या करत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
मेरी थॉमस (वय 60, रा.बोपोडी) या मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून त्यांच्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील पाच हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. पोलीस उपनिरीक्षक एम.ए. कांबळे अधिक तपास करत आहेत.
विश्रांतवाडी आणि मार्केटयार्ड परिसरात भरदिवसा दोन घरफोड्या घडल्या आहेत. कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन्ही ठिकाणचा मिळून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास केला. विश्रांतवाडी परिसरात संतोषनगर येथे राहणारे अनुप वासुदेव (वय50) हे घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी कुलूप उचकटून घरात घुसलेल्या चोरट्यांनी कपाटातील पन्नास हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा 2 लाख 42 हजार 980 रुपयांचा ऐवज लंपास केला. तर त्याच दिवशी मार्केटयार्ड परिसरात सुर्यप्रकाश अपार्टमेंटमध्ये चोरीची दुसरी घटना घडली. कुलदिप राठी हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी घरातील 2 लाख 30 हजार 350 रुपयांचा ऐवज लंपास केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)