उन्हाळा आणि अंगाचा दुर्गंध

अंगाला येणाऱ्या घामानं दुर्गंध येतो असा बऱ्याचजणांचा समज असतो. पण घामाला तसा कोणताच गंध नसतो. घाम हे काही दुर्गंध येण्याचं महत्त्वाचं कारण नाही. दुर्गंध येतो तो त्वचेवरच्या बॅक्‍टेरीयाचा त्वचेमधल्या ऍपोक्राईन नावाच्या रासायनिक परिणामामुळे येतो.

अलकाचं वैवाहिक जीवन उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. कारण होतं तिच्या अंगाला येणारा दुर्गंध.त्यासाठी अलका संपूर्ण अंगाला परफ्युम वापरायची.तिच्या नवऱ्याला दम्याचा विकार होता. त्याला परफ्युमची ऍलर्जी होती. अलकाला आपल्याच अंगाचा दुर्गंध नकोसा व्हायचा, इतका की तिला आपल्या शरीराचा तिरस्कार वाटायचा. अंगाचा दुर्गंध जावा म्हणून तिने बरेच औषधोपचार केले. पण फायदा झाला नाही.शेवटी नवऱ्याने त्याच्या डॉक्‍टरांचा सल्ला घेतला आणि आता ती अंगाच्या दुर्गंधीपासून पूर्णपणे मुक्‍त झाली आहे.

अंगाचा दुर्गंध जाण्यासाठी बरेचजण कितीतरी किलोनं परफ्युम वापरतात. डिओडोरंट वापरतात. घाम येऊ नये म्हणून विविध प्रकारची पावडर्स वापरतात. त्यातही आता पुरुषांसाठी वेगळी आणि स्त्रियांसाठी वेगळी परफ्युम आणि पावडरी बाजारात आल्या आहेत. त्याच्या जाहिराती टीव्हीवर तुम्ही बघत असालच.

अंगाचा दुर्गंध कशामुळे येतो?
अंगाला येणाऱ्या घामानं दुर्गंध येतो असा बऱ्याचजणांचा समज असतो. पण घामाला तसा कोणताच गंध नसतो. घाम हे काही दुर्गंध येण्याचं महत्त्वाचं कारण नाही. दुर्गंध येतो तो त्वचेवरच्या बॅक्‍टेरियाचा, त्वचेमधल्या ऍपोक्राईन नावाच्या घामाच्या ग्रंथीवर होणाऱ्या रासायनिक परिणामामुळे येतो. या घामाच्या ग्रंथी काखेमध्ये, जांघेमध्ये आणि स्तनाग्रांवर जास्त प्रमाणात असतात.

उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यातसुद्धा काखेमध्ये आणि जांघेमध्ये घाम मोठ्या प्रमाणावर येतो. या भागात केस आधीच जास्त असतात आणि त्यात बनियन किंवा अंडरवेअर घट्ट असते. त्यामुळे घामाचे बाष्पीभवन व्हायला कुठे जागाच नसते. अशा ठिकाणी नैसर्गिकपणे असलेले बॅक्‍टेरिआ मोठ्या संख्येने वाढायला लागतात आणि अंगाला दुर्गंध यायला लागतो.

लहान मुलांच्या आणि वयस्करांच्या अंगाला दुर्गंध का येत नाही?
काखेमध्ये घाम बऱ्याच कारणांमुळे येतो. घाबरल्यामुळे, वेदनेमुळे, लैंगिक उत्तेजनामुळे काखेमध्ये घाम येतो. काखेतल्या घामाच्या ग्रंथी वयात आल्यानंतर कार्य करायला लागतात आणि लैगिक ग्रंथी कार्यक्षम असेपर्यत त्याही कार्यक्षम असतात. म्हणून मुलांच्या आणि म्हाताऱ्यांच्या अंगाला दुर्गंध येत नाही.

एक्रिन स्वेदग्रंथी
ही एक प्रकारची घामाची ग्रंथी असते. या ग्रंथीतून जो घाम निघतो त्याला थोडासा गंध असतो. या स्वेदग्रंथी संपूर्ण शरीराच्या त्वचेवर असतात, पण बॅक्‍टेरियांना राहायला जागा देत नाहीत. या स्वेदग्रंथीमुळे शरीराचे तापमान संतुलित राखले जाते. उष्णतेमुळे, व्यायामामुळे, अस्वस्थतेमुळे, मनावरच्या ताणामुळे या स्वेदग्रंथीतून जास्त घाम बाहेर पडतो. याचे प्रमाण जास्त वाढले तर हातापायांच्या तळव्यांना सतत घाम येतो.दुर्गंध येतो आणि पायाच्या बोटांच्या बेचक्‍यांमध्ये फंगस इन्फेक्‍शन होते.

अंगाचा दुर्गंध घालवण्याचा उपाय
त्यासाठी शरीराची विशेषत: त्चचेची काळजी घेणे आहे. रोज आंघोळ करताना कोणताही अंगाचा साबण लावल्याने त्वचेवरचे बॅक्‍टेरिया नष्ट होतात. बनियन आणि अंडरवेअरना घामाचा वास येतो. म्हणून ही अंतर्वस्त्रे रोजच्या रोज बदलावी लागतात. आतले किंवा बाहेरचे कपडे घट्ट घालू नका. त्वचेला मोकळी हवा मिळायला हवी. काखेमध्ये आणि जांघेभोवती असलेल्या केसांमध्ये बॅक्‍टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. म्हणून हे केस वेळच्यावेळी काढायला हवे.

स्वेदविरोधी फवारे
डीओडोरंट फवारे वापरल्याने घामाचा वास येत नाही. डीओडोरंटने केवळ घामाचा वास कमी होतो.परंतु स्वेदविरोधी फवारे वापरल्याने घाम येणेच बंद होते. या दोन्हीमध्ये सुगंधी द्रव्ये असतात. त्यामुळे घामाचा वास दबला जातो. काही फवाऱ्यांमध्ये बॅक्‍टेरियानाशक औषधेपण असतात. त्यामुळे बॅक्‍टेरियाची वाढ थांबते. स्वेदविरोधी फवारे वापरल्याने घाम तीस ते चाळीस टक्‍के कमी होतो. फवाऱ्यापेक्षा मलम जास्त प्रभावी आहे. यामध्येही क्रिम, स्टीक्‍स, लिक्‍वीड व रोल ऑन असे बरेच प्रकार आहेत आणि ते बरेच महागही असतात.

काही फवारे नाकात मारायचेही असतात. पण ते कितपत प्रभावी आहेत सांगता येत नाही. आणि ते फारसे सुरक्षितही नसतात, म्हणून स्वेदविरोधी नाकातले फवारे शक्‍यतो वापरू नये. बहुतेक स्वेदविरोधी औषधांमध्ये ऍल्युमिनियमचे कण असतात. ते त्वचेवर बसतात आणि घाम कमी करतात. बहुतेक फवाऱ्यामध्ये ऍल्युनिनियम क्‍लोरोहायड्रेट हे रसायन असते. शिवाय त्यात बॅक्‍टेरियानाशक द्रव्ये आणि सुगंधीद्रव्ये असतात.

खूप घाम येत असेल तर काय करावे?
प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल तर त्याला हायपरहायड्रोसिस असे म्हणतात. स्वेदविरोधी फवारे यावर फारसे काम करीत नाहीत. घाम येण्याचे कारण शोधून त्यावर इलाज करायला हवा. डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

आणखी कोणती काळजी घ्यायला हवी?
काखेमधले केस काढताना काळजी घ्यायला हवी. फार खरवडून काढू नका किंवा आंघोळ झाल्यावर टॉवेलने अंग खसखसून घासून कोरडे करू नका. केस काढायचेच असतील तर रात्रीच्या वेळेस काढा म्हणजे त्या जागी आग होणार नाही. मग दुसऱ्या दिवशी स्वेदविरोधी फवारा मारा. हे फवारे मारल्याबरोबर लगेच काम करीत नाहीत. म्हणून बाहेर जायच्या बरेच आधी फवारा मारायला हवा.

पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या अंगाला दुर्गंध जास्त येतो का?
असे अजिबात नाही. स्त्री-पुरुष दोघांमध्येही स्वेदग्रंथी सारख्याच प्रमाणात असतात. फक्‍त पुरुष नियमितपणे काखेतले आणि जांघेतले केस काढतात तसे स्त्रिया काढत नाहीत. शिवाय अंगाच्या दुर्गंधीची एवढी पर्वासुद्धा करीत नाहीत.

डॉ. अरुण मांडे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)