उन्हाच्या चटक्‍यावर टॅंकर पाण्याचा “शिडकाव’

जिल्ह्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई : 7 गावे 17 वाड्यांमध्ये 8 टॅंकर सुरू
– आंबेगाव, पुरंदर, भोर तालुक्‍यांना पाणीटंचाईच्या झळा

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.16 – उन्हाचा चटका वाढत असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या वाढू लागली आहे. मागील दहा दिवसांपासून काही गावांमध्ये टंचाई भासू लागल्याने टॅंकर सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये आंबेगाव, पुरंदर, भोर तालुक्‍यात पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यातील 7 गावे 17 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 8 टॅंकर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

पावसाळा सुरू होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याने पाणी टंचाई आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात टॅंकर सुरू करण्याची परिस्थिती उद्‌भवली नव्हती. मात्र, उन्हाच्या वाढत्या कडाक्‍यामुळे काही गावांमध्ये पाणी टंचाई भासू लागली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वात प्रथम पुरंदर तालुक्‍यात टंचाईच्या झळा वाढल्या होत्या. आठ दिवसांपूर्वी केवळ चार टॅंकरद्वारे गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होता. परंतु, संख्येत वाढ झाली असून 8 टॅंकर सुरू आहे.

दरम्यान, पुरंदर पाठोपाठ भोर आणि आंबेगाव तालुक्‍यातील पाणीटंचाई भासू लागली असून जिल्ह्यातील 10 हजार लोकसंख्येची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. यात पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी गाव आणि सात वाड्या, वस्त्या, दिवे गावठाण आणि पवारवाडी, काळेवाडी येथे टंचाई वाढली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील पारगावतर्फे खेड गावठाण व पाच वस्त्या, माळीन गावठाण, तर भोर तालुक्‍यातील भुतोंडे गावठाण, खुलशी धनगरवस्ती, म्हसर बु. हुंबेवस्ती, डेहन गावठाण आणि जळकेवाडी, शिरवली हिमा या गावांना आणि वाड्या वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.

………………
जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती
तालुका         गावे         वाड्या         टॅंकर
आंबेगाव         2             5            3
भोर              4             3            3
पुरंदर            1             9            2
एकूण            7            17           8

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)