उन्नत भारत अभियानात पुणे आघाडीवर 

सर्वाधिक संस्थांची निवड : महाराष्ट्रातील 160 उच्च शैक्षणिक संस्था 
नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या “उन्नत भारत’ अभियानात पुणे आघाडीवर आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 160 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त 33 संस्थांची निवड झाली आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने “उन्नत भारत अभियासाठी’ देशभरातील 840 उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यातील 75 तांत्रिक व 85 अतांत्रिक अशा एकूण 160 उच्च शैक्षणिक संस्थांचा यात समावेश आहे. देशभरातून निवड झालेल्या एकूण 840 शैक्षणिक संस्थांपैकी 521 तांत्रिक, तर 319 अतांत्रिक संस्था आहेत.
यापूर्वी उन्नत भारत अभियान कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात देशातील 688 शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली होती. या वर्षी साज-या होत असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये या संस्था सहभागी होत आहेत.
उन्नत भारत कार्यक्रमांतर्गत फील्ड व्हिझीट, घरो-घरी जावून सर्वेक्षण, ग्रामीण जनतेच्या समस्या व गरजांची माहिती घेणे आणि त्यांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी विविध तंत्र व कार्यपध्दती विकसित करणे आदींचा समावेश आहे.
पश्‍चिम महाराष्ट्रातील 53 शैक्षणिक संस्था
पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त 33 संस्थांची निवड या कार्यक्रमासाठी झाली आहे. यातील 23 तांत्रिक, तर 10 अतांत्रिक संस्था आहे. पुणेसह पश्‍चिम महाराष्ट्राच्या 5 जिल्ह्यातील एकूण 53 संस्थाची निवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत विदर्भातील एकूण 11 जिल्ह्यातील 33 शैक्षणिक संस्था, तर कोकणातील रायगड व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील एकूण 8 संस्थाची निवड झाली आहे. मुंबईतील 4, मुंबई उपनगरातील 3, तर ठाणे जिल्ह्यातील 6 शैक्षणिक संस्थाची निवड उन्नत भारत अभियानासाठी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)