उधारी वसुलीसाठी सोशल मीडिया पोस्टची युक्‍ती 

नाचक्कीच्या धसक्‍याने ताबडतोब पैसे घरपोच
श्रीगोंदे – निरनिराळे उपाय करूनही वसूल न होणाऱ्या उधारीसाठी श्रीगोंदेकरांनी शक्कल लढवली आहे. सोशल मीडियावर आपल्या उधारीविषयी पोस्ट टाकून पैसे वसूल करण्याची नवीन युक्‍ती चांगलीच प्रभावी ठरत आहे. सोशल मीडियावर नाचक्की होऊ नये यासाठी संबंधित व्यक्‍तीला उधारी ताबडतोब घरपोच मिळत आहे. श्रीगोंदेकरांसाठी सोशल मीडिया सध्या वसुलीचे माध्यमच बनले आहे.
हेलपाटे मारून वसूल न होणारी उधारी या युक्‍तीमुळे अवघ्या काही तासात घरपोच होऊ लागली आहे. उधारी वसुलीसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा अतिशय प्रभावी उपाय काही लोकांनी शोधून काढला आहे. सोशल मीडियावर एखाद्या व्यक्‍तीचा नामोल्लेख न करता केवळ विशेष संदर्भ देऊन त्या व्यक्‍तीकडे उधारी असल्याची पोस्ट टाकली जाते. परंतु विशिष्ट व्यक्‍तींनाच काही संदर्भ लागू होत असल्याने पोस्ट कोणाबाबत ते चटकन कळते. नको प्रतिष्ठेला धक्का पोहचायला म्हणून, लवकरच संबंधिताचे पैसे देऊन टाकले जातात.
नुकतीच तालुक्‍यातील लोणी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एका उद्योजकाने सेतू केंद्र चालकाकडून निवडणूक अर्ज भरून घेतले परंतु त्याचे पैसे देण्याचे सोयीस्कररीत्या टाळले. दोन दिवसांपूर्वी या सेतू चालकाने संबंधित व्यक्‍तीचे नाव न टाकता याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकली. या पोस्टच्या परिणामी अवघ्या काही तासात या उद्योजकाने सेतू चालकाची सर्व उधारी जमा केली. पैसे देण्याची ताकद असताना निव्वळ टाळाटाळ करणाऱ्या अनेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकवला जात आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)