उद्‌घाटनापूर्वीच भाजी मंडईची दूरवस्था

पिंपरी – इंद्रायणीनगरमधील संत तुकाराम भाजी मंडईच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन तीन वर्ष झाली असून अजूनपर्यंत इमारतीच्या उद्‌घाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने मंडईची दूरवस्था व्हायला लागली आहे. तसेच परिसरातील मद्यपी व जुगाऱ्यांनी या इमारतीमध्ये ठिय्या मांडला आहे. लाखो रूपये खर्च करून बांधलेल्या इमारतीचे अजून उद्‌घाटनही व्हायचे बाकी असताना, इमारतीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

इंद्रायणीनगरमधील भाजी मंडईचे काम पूर्ण होऊन तीन वर्ष झाली आहेत. भाजी व्यावसायिकांना पाहिजे असणाऱ्या पूर्ण सोयींनी सुसज्ज असलेल्या इमारतीची संपूर्ण रंगरगोटी करून झालेली असून फक्त गाळे द्यायचे बाकी आहे. इमारतीमध्ये एकूण 72 गाळे भाजी विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आले आहे. मात्र, गाळे देण्याचा मुहूर्त मिळण्याच्या आधीच मंडईची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाल्याचे चित्र दिसत आहे. परिसरात सिगारेट व गुटख्याची पाकिटे पडलेली आहे. रात्री येथे मोठ्या प्रमाणावर बाहेरील परिसरातील तरूण येऊन दारू पिऊन आरडा-ओरडा करत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. परिसरात सगळीकडे दारूच्या बाटल्यांचा खच जमा झाला असून तर काही जागेवर दारूंच्या बाटल्या फोडल्या आहेत. वेळेत गाळे वाटप न झाल्यास इमारत ओस पडण्याची भिती व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजी विक्रेत्यांना हव्या असणाऱ्या सुविधेची पूर्ण काळजी इमारत उभारणीच्या वेळी घेण्यात आली आहे. त्यानुसार इमारतीमध्ये भाजी धुण्यासाठी स्वतंत्र दोन ठिकाण तयार केले आहेत. मात्र, नळांना पाणी यायच्या आधीच नळांच्या तोट्या लंपास केल्या आहेत. त्याच ठिकाणी असलेल्या ड्रेनेजच्या पाईपलाईन देखील तोडण्यात आल्या आहेत. तीन वर्षात परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. वेळेवर साफसफाई करायला कोणी येत नसून यामुळे परिसरात डासांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे.

सुरक्षा रक्षकांनाच धक्‍काबुक्‍की
बाहेरच्या परिसरातून मद्यपी आणि जुगारी येत असल्याने रात्रभर त्यांचा आवाज परिसरात असतो. सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचे देखील कोणीच ऐकत नाही. त्यांना देखील धक्काबुक्की करण्यात येत आहे. परिसरात यामुळे दादागिरी वाढत आहे. मात्र, तरी देखील महापालिका या बाबींकडे दुर्लक्ष करत आहे. ज्या भाजी विक्रेत्यांनी गाळ्यांसाठी अर्ज केले आहेत. त्यांना गाळे वेळेत दिल्यास परिसरात सर्वत्र शांतता राहील. तसेच आता रस्त्यावर भरत असलेल्या बाजारामुळे ये-जा करायला अडचणी येत आहे. परिणामी परिसरात वाहतूक कोंडी देखील वाढत आहे. यामुळे तातडीने मंडईचा प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)