उद्योजकांचे लाड अन्‌ शेतकऱ्यांचे हाल : घुले

खंडित वीजपुरवठ्यामुळे जायकवाडी बॅकवॉटर परिसरात पाण्यासाठी वणवण

नगर: जायकवाडीच्या बॅकवॉटर परिसरासह जवळपासच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. जायकवाडीच्या पाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय या परिसरातील गावांना नाही. त्यामुळे सध्याही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. औरंगाबाद शहरासह औद्योगिक वसाहतीमधील उद्योगकांना पाणी कपात केली नाही की वीजपुरवठा खंडित केला नाही. परंतू शेवगाव तालुक्‍यातील जायकवाडीच्या बॅकवॉटर परिसरात असलेल्या गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने सध्या सुमारे 10 गावांमधील ग्रामस्थांची वणवण सुरू झाली आहे. सरकारकडून उद्योजकांचे लाड तर शेतकऱ्यांचे हाल करण्यात येत असल्याची टिका माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जायकवाडी जलाशयावरील भारनियमन वाढवून फक्त चार तास वीज पुरवठा करण्याचे आदेश देऊन असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळले अशी टीका माजी आमदार नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांनी केली आहे.

जायकवाडीच्या बॅकवॉटरला शेवगाव तालुक्‍यातील दहिगावने, भावीनिमगाव, देवटाकळी, मठाची वाडी, शहरटाकळी आदी गावे आहेत. या गावांना पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत केवळ जायकवाडीच्या बॅकवॉटरचा आहे. परंतू गेल्या दोन दिवसांपासून महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्यास सुरूवात केली आहे. केवळ चार तास वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहे. यावरून घुले यांनी या चुकीच्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले, जायकवाडी धरणासाठी या गावांतील अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांना अजूनही त्यांचा मोबदला मिळाला नाही. जमिनी गेल्याने अनेकजण विस्तापित झाले आहेत. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. परंतू आज पिण्यासाठी पाणी देण्यास अडचणी निर्माण केल्या जात आहे. या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जायकवाडीचे बॅकवॉटर हा एकमेव पर्याय आहे. तोही आता वीजपुरवठा खंडित करून बंद केला जात आहे.

धरणग्रस्त गावांना या धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. दुष्काळात विहिरी, बोअरवेल आटल्याने शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यात माणसे, जनावरे यांच्यासाठी पाणी मिळेणासे झाले आहे. जायकवाडीतून शेवगाव पाथर्डी व 54 गावे, शहरटाकळीसह 28 गावे , बोधेगाव -हातगाव व इतर गावे या पाणी योजनेतून साडेतीन लाख माणसे व जनावरांची तहान भागवली जाते. वीज पुरवठा चार तासावर आल्याने अनेक गावांना पुरेसा पाणी पुरवठा होणार नाही. औरंगाबाद, एम.आय.डी.सी.व इतर उद्योगांना पाणी पुरवठा व्हावा म्हणून 24 तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांनी जमिनी दिल्याने धरण निर्मिती झाली. त्या पाण्यावर औरंगाबाद परिसरात अनेक उद्योगधंदे उभा राहिले आहेत.

चार तास वीज दिल्याने विद्यार्थ्यांनी मेणबत्तीच्या उजेडात अभ्यास करायचा का? पिण्याच्या पाण्यासाठी माता भगिनींनी डोक्‍यावर हंडा घेवून वणवण भटकंती करायची का? असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शेवगाव पाथर्डी तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला असून शासनाने भारनियमन करून दुष्काळात शेतकऱ्यांना जगणे मुश्‍कील केले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटीत होवून पक्ष व राजकारण विरहित अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन घुले बंधु तसेच धरणग्रस्त कृती समितीने केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)