उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी सूक्ष्म नियोजन आवश्‍यक – रामदास माने

निगडी – उद्योग, व्यवसाय उभारण्यासाठी वित्तीय संस्था, बॅंका, शासनाचे नियम व अटी यासाठी लागणारे मनुष्यबळ, उत्पादित वस्तूंची मागणी, विक्री पश्‍चात सेवा आणि स्पर्धेत टिकण्याची तयारी याबाबत सूक्ष्म नियोजन आवश्‍यक असल्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ उद्योजक रामदास माने यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या विद्यमाने उद्योजकता परिचय शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी रामदास माने बोलत होते.

उद्योजकता विकास केंद्राचे पुणे विभागीय संचालक सुरेश उमाप, एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, प्रकल्प अधिकारी मिलिंद लोंढे यावेळी उपस्थित होते. रामदास माने यांच्या जीवनावर “ग्रामीण भागातील विद्यार्थी ते यशस्वी उद्योजक’ चित्रफित यावेळी दाखवण्यात आली.

ग्रामीण भागात अशिक्षित कुटुंबात जन्मलो. गरजेपुरते शिक्षण घेऊन मी नोकरीच्या शोधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये आलो. संकटांचा सामना करत संधी मिळताच स्वत:चा व्यवसाय सुरू केला. स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून काबाड-कष्ट करून शेकडो गरजू हातांना रोजगार देऊ शकलो. राष्ट्रीय स्वच्छता अभियानासारख्या केंद्र व राज्य सरकारच्या अभियानामध्ये माने ग्रुप ऑफ कंपनीज्‌चे उत्पादन घेतले जाते. थर्माकोल बनवणारा जगातील सर्वात मोठा प्रकल्प आणि सर्वात मोठे थर्माकोल उत्पादन करण्याचा विक्रम कंपनीच्या नावे आहे. हे साध्य करण्यासाठी ध्येयाने प्रेरित होऊन मी काम केले. यासाठी सूक्ष्मपणे नियोजन करून बाजारातील मागणी, पुरवठा, विपणन व्यवस्था, कमी खर्चात उत्पादन, मनुष्यबळाचा योग्य वापर या गोष्टींवर मी बारकाईने काम केले. उद्योजक होण्यासाठी उद्योगपतींच्याच घरी जन्माला यावे, असे काही नाही. तर अचूक संधी शोधून योग्य वेळी निर्णय घेऊन कष्टातून देखील उभे राहता येते, असे माने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

तरुणांनी नोकरी व उद्योग यापैकी एक निवडण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा उद्योगाची निवड करावी. आज देशाला तरुण उद्योजकांची गरज आहे. उद्योग धंद्याच्या वाढीबरोबरच रोजगार निर्मिती होईल आणि देशाची आर्थिक प्रगती होईल. विद्यार्थी दशेपासूनच यशस्वी उद्योजक होण्याचा ध्यास घेऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे डॉ. डॅनीअल पेनकर म्हणाले.
पीसीईटीचे अध्यक्ष व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. एमसीईडीचे विभागीय तज्ज्ञ संचालक सुरेश उमाप, अशोक पत्तर, पंडित गावडे, सुनील शेटे, सुभाष रणदिवे यांनी देखील मार्गदर्शन केले. यशस्वी उद्योजक सचिन गायकवाड, डॉ. कीर्ती धारवाडकर आणि हेमंत भागवत शिबिराच्या समारोपास उपस्थित होते. व्यवस्थापन शाखेच्या 105 विद्यार्थ्यांनी शिबिरात भाग घेतला. डॉ. हंसराज थोरात यांनी संयोजन, प्रा. प्रणिता बुरबुरे यांनी सूत्रसंचालन व प्रा. ऋषिकेश कुमार यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)