उद्योग नगरीतही लागू होईल काय पार्किंग पॉलिसी?

  • शुल्क वसुलीची तयारी ः अंतर्गत रस्ते वाहनांनी व्यापले
  •  शहरात 20 लाखांहून अधिक वाहने
  •  दरवर्षी 10 ते 12 टक्‍क्‍याने वाहनांत वाढ
  •  सार्वजनिक वाहन तळाचा अभाव

पिंपरी, (प्रतिनिधी) – पुणे महापालिकेने रस्त्यावरील वाहनांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्यासाठी सार्वजनिक पार्किंग पॉलिसी तयार केली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये देखील रस्त्यावर वाहने लावणाऱ्या वाहन धारकांकडून शुल्क वसूल करण्यासाठी सार्वजनिक पार्किंग पॉलिसी तयार करण्याची लगबग सुरू असल्याचे कळते. याबाबत खुद्द महापौरांनी प्रशासनास सूचना केल्या असून आयुक्‍तांनी देखील आपण या दिशेने प्रयत्न करत असणार असल्याचे सांगितले.

या निर्णयाने सध्या शहरात मोठी चर्चा सुरु होऊन आरोपांच्या फेऱ्या झडू लागल्या आहेत. विरोधक आणि नागरीक पुणे पालिकेच्या शासक आणि प्रशासनाच्या या निर्णयाचा कडाडून विरोध करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशा प्रकारचा निर्णय अंमलात आणण्यात आला, तर येथे देखील मोठ्या प्रमाणात विरोध होण्याची शक्‍यता आहे. परंतु खरोखरीच उद्योग नगरीत अशा प्रकारच्या पार्किंग पॉलिसीची गरज आहे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
तर शुल्क का आकारू नये?
पिंपरी चिंचवड शहरात वाहनांची संख्या गेल्या एक दशकामध्ये खूप झपाट्याने वाढली आहे. तसेच नागरीकरण देखील वाढले आहे. शहरातील मुख्य मार्ग जरी प्रशस्त असले तरी उपनगरांमधील अंतर्गत रस्ते गल्ली-बोळाप्रमाणे झाले आहेत. सर्वच नियमांना धाब्यावर बसवून वाट्टेल तसे बांधकाम केले असल्याने उपनगरांमध्ये खासगी पार्किंगला वावच उरला नाही. पर्यायाने विशेषतः रात्रीच्या वेळी सर्व वाहने रस्त्यावरच पार्क होतात. कित्येक लहान-लहान मार्गांवर चार चाकी दूरच परंतु दुचाकी घेऊन जाणे देखील अवघड होऊन जाते. आपल्या घरासमोरील रस्ता हे आपले अंगण नसून सार्वजनिक मालमत्ता आहे, त्याचा वापर वाहने चालवण्यासाठी करणे योग्य आहे. त्यावर जर वाहने पार्क करायची असतील तर शुल्क द्यावेच लागेल, असे मतही शहरातील जागरुक नागरीक व्यक्‍त करत आहेत.
नव्या इमारतींमध्येही पार्किंगची सोय नाही
एक-दोन गुंठ्यांमध्ये तीन ते चार मजली इमारती उभ्या करण्यात आल्या आहेत, परंतु पार्किंगसाठी एक फूटही जागा सोडण्यात आली नाही. विशेषत उपनगरांमध्ये नवी सांगवी, पिंपळे गुरव, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, बिजलीनगर, भोसरी परिसरात कित्येक भागांमध्ये सत्तर टक्‍क्‍यांहून अधिक बांधकामांमध्ये पार्किंगचा जराही विचार करण्यात आला नाही. दोन्ही बाजूने नागरिकांनी आपले बांधकाम वाढवून रस्ता एखाद्या गल्ली-बोळासारखा केला आहे. याच गल्ली-बोळात वाहनांची संख्या रोज वाढत चालली आहे. मजले तर वाढवले परंतु पार्किंग रस्त्यावरच केले, यामुळे पार्किंग शुल्क वसूल करण्याचा विचार प्रशासन करत आहे.
काय होणार परिणाम?
कित्येक विकसित देशांनी वाहनांची वाढती संख्या थोपवण्यासाठी अशा प्रकारचे उपाय अवलंबले होते, तसा काहीसा प्रयत्न पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये होत आहे. परंतु हा प्रयत्न येथे यशस्वी होईल का? याबाबत ही शंका व्यक्‍त केली जात आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे उपनगरातील गल्ली-बोळात ही पॉलिसी अमलात आणणे खूपच अवघड आहे. पुण्याप्रमाणे पिंपरी िंचंचवडमध्ये महापालिकेची सार्वजनिक वाहनतळे नाहीत. याचाही परिणाम या पॉलिसीवर होऊ शकतो. वाहनांची संख्या आटोक्‍यात आणण्यास अल्पशी मदत मिळण्याची शक्‍यता आहे. योग्य अंमलबजावणी झाल्यास चांगले उत्पन्न मिळू शकेल. दुसरीकडे पार्किंगचे ठेके मिळवण्यासाठी चांगलीच रस्सीखेच होऊ शकते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे खासगी पार्किंगची व्यवस्था असलेल्या घरांच्या किंमती आणि भाडे दोन्ही वाढण्याची शक्‍यता आहे. पार्किंग शुल्क लागू झाल्यावर वाहने सरळ आणि सुरळीत लागतील. सध्या जसे मनाले येईल तशा पद्धतीने वाहने पार्क केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होताना दिसते.
विरोधाला सुरुवात
पार्किंग पॉलिसीवर विचार सुरु होताच पिंपरी चिंचवड शहरात विरोधाचे सूर घुमू लागले आहेत. कित्येक संघटनांनी पे ऍण्ड पार्कचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तर पार्किंग शुल्कास जिझीया कर असे संबोधले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)