उद्योगांना हवे भयमुक्‍त वातावरण

पिंपरी – सुमारे 3000 एकरहून अधिक परिसरात पसरलेले औद्योगिक क्षेत्र… 76 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते… हजारो लहान-मोठे उद्योग… लाखो कामगार… असा सर्व व्याप असलेल्या पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात सध्या वाढती गुन्हेगारी, चोऱ्या उद्योगांना त्रास देत आहेत. उद्योगांना औद्योगिक परिसरात भयमुक्‍त वातावरण अपेक्षित आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे औद्योगिक संघटना प्रयत्न करत आहेत.
बऱ्याच दिवसांपासून उद्योग परिसरांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच कामगार वर्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍नही ऐरणीवर आला आहे. याबाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनने देखील पाठपुरावा सुरू केला आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून वेगवेगळ्या औद्योगिक संघटना एमआयडीसी परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक प्रबळ करण्याची मागणी करत आहेत. परंतु नेहमीच या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार उद्योजकांकडून केली जात होती. पिंपरी-चिंचवड शहराला नवीन आयुक्‍तालय मिळाल्यानंतर आता उद्योगांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात चोऱ्या लूटमार अशा घटना वाढत चालल्या आहेत. यांना आळा घालण्यासाठी शहर पोलीस आयुक्‍तांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली, तसेच औद्योगिक परिसर खूप मोठा असल्याने सतत गस्त राहणे गरजेचे असल्याचे देखील सांगण्यात आले. औद्योगिक परिसरात भयमुक्‍त वातावरण असावे, यासाठी पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी उद्योजकांनाही काही उपाययोजना सुचविल्या, तसेच संबंधित परिसरातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस अुायक्‍तालयाचा शंभर नंबर अद्याप सुरू झाला नसल्याने उद्योजकांना अडचण आल्यास 020 27450666, 020 27450888 नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन देखील केले आहे.

उपाययोजना आली कामाला
पूर्वी पोलिसांना फोन केल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यास किमान अर्धा तास लागत असे, यावर देखील नवीन पोलीस आयुक्‍तांनी काम केले. खूप मोठा परिसर व अंतर्गत रस्ते माहीत नसल्याने उशीर होत असल्याचे ध्यानात घेत नवीन उपाययोजना करण्यात आल्या. या संदर्भात ट्रायल घेतल्यानंतर जिथे पोहचण्यासाठी पूर्वी अर्धा तास लागत असे, त्याठिकाणी पोलीस आता सहा ते दहा मिनिटांमध्ये पोहचत असल्याची चाचणी देखील घेण्यात आली. या चाचणी फोरमचे अध्यक्ष व सदस्य यांच्या फोन कॉल्सवर घेण्यात आल्या असल्याने उद्योजकांनी समाधान व्यक्‍त केले.

-Ads-

पोलिसांच्या समस्या
पोलिसांकडून सध्या चांगला प्रतिसाद मिळत असला आणि चाचण्यांमध्ये पोलीस वेळेत घटनास्थळी पोहचत असले तरी एमआयडीसीचा परिसर हा तीन हजार एकरांचा असून अंतर्गत रस्ते 76 किमींचे आहेत. ही बाब ध्यानात घेता येथे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असावी, अशी मागणी उद्योजकांतर्फे करण्यात येत आहे. परंतु सध्या नवे आयुक्‍तालय असल्यामुळे पोलीस बळ अत्यल्प आहे आणि पोलिसांकडील वाहनांची संख्या खूपच कमी आहे.
उद्योजकांच्या समस्या मांडण्यासाठी फोरमच्या वतीने अभय सोपनराव भोर व पदाधिकारी हरिभाऊ भोकरे, ओमप्रकाश रोहरा, अनिरुद्ध थिटे, उमेश टिंगरे, निलेश कुलकर्णी, प्रशांत पठारे, विशाल पठारे इत्यादी उपस्थित होते.

उद्योजकांनाही घ्यावा लागेल पुढकार
उद्योग परिसरात शांतीपूर्ण आणि भयमुक्‍त वातावरणासाठी उद्योजकांनाही पुढाकार घ्यावा लागणार आहे. पोलिसांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ आणि वाहनांचा अभाव पाहता, उद्योजकांनी गस्त घालण्यासाठी स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमावेत, तसेच उपलब्ध होतील तेवढी वाहने गस्तीसाठी उपलब्ध करून द्यावीत. या वाहन आणि सुरक्षा रक्षकांसोबत पोलीस कर्मचारी असतील, असा प्रस्ताव पोलिसांकडून उद्योजकांना देण्यात आला आहे.

‘उद्योजकांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून आमच्याकडे तक्रार केली होती. इथूनपुढे त्यांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली जाणार आहे. तसेच औद्योगिक भागात गस्त घालणे उपलब्ध मनुष्यबळात शक्‍य नाही. त्यासाठी तेथील उद्योजकांशी चर्चा करुन प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात उद्योजकांनी त्यांचे स्वतंत्र सुरक्षा रक्षक नेमावेत तसेच उपलब्ध होतील तेवढ्या गाड्या द्याव्यात. गाडी व गार्डसोबत आमचा पोलीस कर्मचारी असेल. त्यामुळे औद्योगिक परिसरातील गुन्हेगारीवर वचक बसेल.’
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)