उद्योगांचाही बजेटमध्ये विचार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराची ओळख उद्योगनगरी या नावाने गेल्या पाच दशकांपासून होत आहे. या शहरातून दहा हजाराहून अधिक लहान-मोठे उद्योग आहेत. परंतु उद्योगनगरीच्या उद्योजकांची पालिकेविषयी नेहमीच तक्रार असायची की उद्योगांकडून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असूनही पालिका उद्योगांना आवश्‍यक सुविधा पुरवत नाही. उद्योग क्षेत्राची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये आयुक्‍तांनी केलेला दिसत आहे.

आगामी आर्थिक वर्षासाठी आयुक्‍तांनी स्थायी समितीकडे सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये उद्योगांकडे लक्ष केंद्रित केले आहे. यात प्रामुख्याने नव उद्योजक घडवण्यासाठी स्टार्टअप इनक्‍युबेशन सेंटर स्थापन करण्याची तरतूद आहे. याचप्रमाणे बजेटमध्ये शहरात वाणिज्य क्षेत्राचा विकास करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

शहरातील हिंजवडी, तळवडे या परिसरात आयटी हब विकसित झाले आहेत. उद्योगनगरीसोबत आयटी कंपन्यांनी शहराला आयटीनगरी असेही एक बिरुद दिले आहे. तसेच रोजगाराचे मोठ्या संधीही आयटी क्षेत्राने शहराला दिल्या आहेत. शहरात आयटी क्षेत्राचा आणखी विकास व्हावा, यासाठी टाऊन प्लॅनिंग स्कीमचा वापर करुन आयटी हब स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे जुन्याच असलेल्या सिटी सेंटर आणि डिस्ट्रीक्‍ट सेंटर यांचा विकास करण्याच्या तरतुदींनी पुन्हा एकदा बजेटमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपळे गुरव येथे व्हिजेल प्लाझा आणि पिंपळे सौदागर येथे कोकणे चौक प्लाझा निर्माण करणे या तरतुदींचाही अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांनी उद्योजकांना भेडसावत असलेल्या काही प्रमुख समस्यांपैकी एक असलेली समस्या म्हणजे कुशल मनुष्यबळाचा अभाव. उद्योगांमध्ये सध्या कुशल मनुष्यबळाचा मोठा तुटवडा जाणवत आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकात भविष्यवेधक कौशल्य निर्मिती करण्याकरिता कौशल्याधिष्ठीत कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. शहरात साक्षरता व रोजगार दर अधिक असून कौशल्य विकास उपक्रमांवर भर देण्याची गरज लक्षात घेत उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)