उद्योगपतींच्या फायद्यासाठीच नोटाबंदीचा निर्णय

राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात


राफेलप्रकरणी जेपीसीची मागणी

नवी दिल्ली – रिझर्व बॅंकेचा नोटाबंदीशी संबंधित अहवाल आल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. मोठ्या उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी मोदींनी सर्वसामान्यांच्या पोटावर लात मारणारा नोटाबंदीचा निर्णय घेतला, असा सनसनाटी आरोप त्यांनी केला.

24 अकबर रोडवरील कॉंग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी नोटाबंदी आणि राफेल डीलच्या मुद्यावरून मोदी यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले. रिझर्व बॅंकेच्या अहवालाचा उल्लेख करीत राहुल गांधी म्हणाले की, नोटाबंदी हा चुकून घेण्यात आलेला निर्णय नव्हे. तर तो जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. पंधरा-वीस उद्योगपती मित्रांना फायदा पोहचविण्यासाठी नोटाबंदी जाहीर करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे, नोटाबंदीचा निर्णय घेताना मोदींना सव्वाशे कोटी लोकांची जराही दया आली नाही, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नोटाबंदीमुळे काहीही साध्य झालेले नाही हे रिझर्व बॅंकेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांचे आणि सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. मुळात ऍमेझॉनसारख्या कंपन्यांना फायदा पोहचविण्यासाठीच लहान दुकानदारांना संपविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे, असे राहुल म्हणाले.

भाजपाध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेत सातशे कोटी रूपये जमा झाले. मुळात, नोटाबंदी ही चूक नसून मोठा महाघोटाळा आहे, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी यांना धारेवर धरले.

मित्रांसाठीच राफेल “डील’
राफेल जेट विमानाची डीलसुध्दा अनिल अंबानी यांना फायदा पोहचविण्यासाठीच करण्यात आली, असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला. उद्योगपतींच्या फायद्यासाठीच राफेल विमानांची किंमत वाढवण्यात आली. दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करण्यासाठी सरकारने संसदेची संयुक्त समिती स्थापन करून राफेल घोटाळ्याची चौकशी करण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. अनिल अंबानी कॉंग्रेसच्या नेत्यांवर खटले दाखल करीत आहेत. परंतु, यामुळे सत्य बदलणार नाही, असेही राहुल म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)