उद्योगपंढरीत अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक

वाकी-दिवसेंदिवस विस्तारत्या चाकण उद्योग पंढरीत अल्पवयीन गुन्हेगारांचे वाढते प्रमाण चिंताजनक होऊ लागले असून, हे वाढते प्रमाण भविष्यातील धोक्‍याची घंटा मानली जात आहे. आजचे युवक हे उद्याच्या देशाचे उज्ज्वल भविष्य समजले जाते, ही वस्तुस्थिती असली तरी सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला अक्षरशः विविध व्यसनांनी ग्रासले आहे. एवढेच नव्हे तर, सध्या अन्नापेक्षा व्यसन महाग झाले असतानाही आजची युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटून गेल्यामुळे व्यसनाकरिता पैसे कमी पडू लागल्यावर हेच युवक गुन्हेगारीकडे वळत असल्याने पालक वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे.
वाहन उद्योगाची पंढरी व जागतिक पातळीवर ऑटोमोबाईल हब म्हणून चाकण औद्योगिक परिसराची ओळख निर्माण झाली आहे. देशाच्या इतर राज्यासह पुणे, मुंबईतील अनेक कामगार औद्योगिक भागातील नोकरी धंद्यामुळे येथे राहण्यासाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण भागात आले आहेत. येथे घरे घेऊन अथवा भाड्याने राहिल्याने शहराला गुन्हेगारीचा विळखा पडू लागला आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढतच राहत असून, अल्पवयीन मुलांचे गुन्हेगारीतील प्रमाणही चिंताजनक झाले आहे. हे गुन्हेगारीचे वाढते प्रमाण सर्वसामान्य नागरिकांना विचार करायला लावणारे आहे. याकरिता जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे.
चाकण औद्योगिक भागातील आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमुळे विकासाचे वारे वेगाने धावू लागले आहे. मागील काही महिन्यात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत. यातील अनेक गुन्हेगार व अत्याचार करणारे गुंड मात्र समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांना अल्पवयीन मुलांचे कायदे आणि त्यांचे फायदे चांगले माहिती झाले आहेत. त्यामुळे कायद्याचा फायदा मिळविण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या या अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारीचे असलेले आकर्षण हेरून त्यांना पद्धतशीरपणे सर्रास वापरून घेत आहेत. अल्पवयीन गुन्हेगारी रोखण्यासाठी पालकांनाच मुलांसोबतच संवाद वाढवावा लागणार आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्याच्यासोबत शालेय स्तरावर मुलांना त्यांचे धोके समजावून सांगण्याची नितांत गरज आहे. मोठ्या कुख्यात गुन्हेगारांपासून ते लहान-सहान गुन्हेगारांनी त्यांच्या गुन्हेगारीची सुरूवातच बालवयात केल्याची अनेक उदाहरणे या भागात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे मुलांचे आयुष्य उद्धस्त होऊ नये, व समाजाला वेठीस धरणारा गुन्हेगार तयार होऊ नये, यासाठी वेळीच जनजागृती करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

 • राजकीय नेत्यांकडून पाठराखण
  स्वतःची पोळी भाजण्यासाठी व राजकीय लोकांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता गुंडांना आपल्या पदरी चांगलेच पोसले आहे. यातील अनेक गुंडांची पाठराखण करून आणि त्यांना मानाची पदे देऊन ते आमच्यासाठी काम करतात, हे खुद्द राजकीय पक्षांनी समाजाला दाखवून दिले आहे. टोळ्या व ग्रुप करायचा आणि त्या माध्यामातून गुन्हेगारी करण्याचा नवा फंडा या परिसरात दिवसेंदिवस रुजू होऊ लागला आहे. गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासन व समाजासमोर निर्माण झाले आहे.
 • दंडुकेशाहीने प्रश्‍न सुटेल का?
  गुन्हेगारी करणाऱ्या युवकांच्या टोळ्या बंद करावयाच्या असतील तर, या टोळ्यांमध्ये होणारी भरती रोखण्याची नितांत गरजेचे आहे. त्यासाठी त्यांतील टोळी प्रमुखांना कायद्याच्या कचाट्यात घ्यावे लागेल. नुसत्या दंडूकेशाहीने हा प्रश्न सुटणार नाही. पोलिसांच्या जागरूकतेने गुन्हेगारांवर वचक बसेल, असे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 • दप्तरांत पुस्तकांऐवजी चाकू, पिस्तूल
  अल्पवयीन युवकांमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, अवघ्या 15 ते 20 वयोगटातील मुलांचा गंभीर सहभाग चिंताजनक आहे. पालकांनी आपली मुले दिवसभर काय करतात. कुठे जातात. त्यांचे मित्र कोण आहेत, याची सखोल माहिती ठेवायला पाहिजे. कित्येक मुले शाळा – कॉलेजमध्ये सुत्रा दादागिरी करतात. या ठिकाणीही त्यांचे ग्रुप आहेत. आपल्या दप्तरात शाळेच्या पुस्तकांसोबत चाकू, पिस्तूल यासारखी घातक हत्यारे आढळून आली आहेत. याची सुद्धा पालकांना माहिती नसते, ही मोठी शोकांतिका आहे.
 • भाई लोकांचे आकर्षण
  वाढती गुन्हेगारी, गुन्हेगारी करणाऱ्या भाई लोकांच्या गळ्यातील मोठ – मोठ्या सोन्याच्या चैनी, आलिशान गाडी हे सगळे पाहून अल्पवयीन मुले भांबावून जात आहेत. या सगळ्यांचे आकर्षण या अल्पवयीन मुलांमध्ये वाढू लागले असून, कमी श्रमात व अत्यंत कमी वेळेत भरपूर माया (पैसे) मिळू लागल्याने आणि त्या मिळालेल्या पैशातून हवी तसी मौज – मजा, चैन करायला मिळत असल्याने आपोआप अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)