उद्योगनगरीला वेध सुखकर्त्याचे

पिंपरी – मांगल्याचे प्रतिक असलेल्या सुखकर्ता गणरायाचे उद्या (दि. 13) घरोघरी आगमन होत आहे. श्रींच्या स्वागताची जय्यत तयारी गणेशभक्‍तांनी केली आहे. मंडळाचे कार्यकर्ते देखाव्यास शेवटचा हात फिरवण्यात व्यस्त असून आगमनाच्या मिरवणुकीची जोरदार तयारी त्यांनी केली आहे. दुसरीकडे घरोघरी बाप्पाला आणण्यासाठी स्वच्छता, पूजा, नैवेद्याची पूर्वतयारी जोरात सुरू असून आबाल-वृद्ध आता बाप्पांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

गणेशोत्सवाची संस्कृती रुजवणाऱ्या पुण्यालगतच्या पिंपरी-चिंचवड कामगारनगरीतही गणेशोत्सव मोठ्या दणक्‍यात साजरा केला जातो. पुण्याच्या तोडीस तोड देखावे याठिकाणी पहायला मिळतात. गणरायाचे आगमन काही तासांवर येवून ठेपल्याने गणेश भक्‍तांच्या आनंदाला उधाण आले आहे. घरोघरी साफसफाई, आरास तसेच गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. ज्या घरांमध्ये गणपतीसोबत गौराईंची देखील स्थापना होते तिथे रंगरंगोटी, मांडणी, सजावट अंतिम टप्प्यात पोहचले आहे.

प्रत्येक घरात एक वेगळाच उत्साह, चैतन्य आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. सोसायट्यांनी छोटेखानी मिरवणुकीद्वारे एकत्रच गणरायाला घरी आणण्याचे नियोजन केले आहे. गणपतीरायाची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी गुरुजींची खूप गरज असते. गेल्या काही वर्षांपासून गुरुजींची संख्या खूप वेगाने कमी होत असल्याने सध्या जेवढे गुरुजी आहेत ते खूपच बिझी असल्याचे दिसून येत आहे. सर्वच गुरुजींनी आपले वेळापत्रक आखून ठेवले असून, पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री तयार ठेवली आहे.

शाळा, विद्यालये, औद्योगिक कारखान्यांमध्येही गणरायाचे आगमन होत असून त्यासाठी दिवसभर सजावट करण्यावर भर देण्यात आला. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी कामे वाटून घेतली असून बाप्पांना मांडवात कसे आणायचे, पूजा किती वाजता करायची याच्या तयारीत काही जण जुंपले आहेत. देखावे पहिल्या दिवसापासूनच खुले करण्याचा काही मंडळांचा प्रयत्न आहे. मंडळांनी नियोजित ठिकाणी विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईची व्यासपीठे तयार केली आहेत. पुरातन वास्तुच्या प्रतिकृती तसेच जिवंत देखाव्यांवर मंडळांचा भर दिसून येत आहे. प्लॅस्टिक बंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, व्यसनमुक्‍ती आदी विषयांवर देखावे सादर होणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना यंदाचा गणेशोत्सव मनोरंजनाची पर्वणीच ठरणार आहे.

बाजारपेठांमध्ये दिवाळी
वर्षभर आतुरतेने वाट पाहिल्यानंतर गणपती बाप्पांचे अखेर आगमन होत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी जणू काही संपूर्ण शहरच गजबजून गेले आहे. बाजारपेठांमध्ये अक्षरशः दिवाळीचा माहौल आहे. सुखकर्ता बाप्पा आपल्यासोबत येताना समृद्धी ही घेऊन येतात याचीच प्रचिती आता रस्त्यावर बसून दुर्वा विकणाऱ्यांपासून ते सोने-चांदीचे दागिने विकणाऱ्या मोठ्‌-मोठ्या व्यावसायिकांना येत आहे. पिंपरी बाजारातील गेल्या दोन दिवसांचे वातावरण पाहता गणेशोत्सव काही व्यापाऱ्यांसाठी वर्षभरातील सर्वांत मोठा सीझन ठरत आहे. रस्त्यावर बसून दुर्वा, कमळे आणि आघाड्याची पाने विकणाऱ्या गरीब मुलांना देखील बाप्पा सुखावून गेला आहे तर दुसरीकडे सजावटीच्या वस्तू, लाईटच्या माळा, थर्माकोलची आसने, स्पीकर, मिठाई, फुले, पूजा सामग्री अशा कित्येक प्रकारच्या व्यापाऱ्यांना या उत्सवांनी एक प्रकारची आर्थिक चालना दिली आहे.

1 हजार 885 मंडळांनी घेतला परवाना
बाप्पांच्या आगमनासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशा पथके सज्ज ठेवली आहेत. या विलोभनीय सोहळ्यात पिंपरी-चिंचवडमधील 1 हजार 885 गणेश मंडळ सहभागी होणार आहेत. स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाच्या उभारणीचे अजूनही कामकाज सुरु आहे. त्यामुळे यंदा गणेश मंडळांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले नव्हते. मात्र, गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेत स्वयंस्फूर्तीने लेखी अर्ज तसेच विविध प्रकारचे ना हरकत दाखले आणून दिले. गतवर्षीच्या तुलनेत परवाना घेणाऱ्या मंडळांच्या संख्येत 500 ने वाढ झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)