उद्योगनगरीत आदिशक्‍तीचा जागर सुरू

पिंपरी – उदे गं अंबे उदे, जय माता दी, असा गजर करत पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीमध्ये बुधवारी (दि. 10) पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. मंत्रपठण, सनई, नगारावादन, पूजाविधीमुळे शहरातील ग्रामदैवतांची मंदिरे मंगलमय वातावरणाने उजळून असून महिला वर्गाच्या उत्साहाला उधाण आले आहे.

शक्तीचं, सृजनाचं, तेजाचं आणि निर्धाराचं प्रतिक असलेल्या देवीचा नवरात्रोत्सव आजपासून सुरु झाला. मंदिरामध्ये पहाटेपासून सुरू असलेले मंत्रपठण, पूजाविधी, सनई नगारा वादन अशा मंगलमय वातावरणाने शहर भारावले होते. दीपमाळांसह वैविध्यपूर्ण फुलांची आरास आणि रोषणाईने मंदिरे सजविली होती. महिलांनी देवीची खणा-नारळाने ओटी भरण्यासाठी गर्दी केली होती. घट बसविण्यासाठी घरोघरी लगबग सुरू होती. सकाळीच विधीवत घटस्थापना करण्यात आली. घटस्थापनेमुळे पूजा सांगणारे गुरूजी उपलब्ध नव्हते. काहींनी ऑडिओ सीडीतील माहितीनुसार घट बसवले. महिला वर्गाच्या नऊ दिवसाच्या उपवासामुळे फराळाचे साहित्य, फळांच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या होत्या.

-Ads-

घटस्थापनेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी शहरातील विविध भागातील मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. खराळवाडी येथील खराळआई, मोरवाडीतील मोरजाई, दुर्गादेवी टेकडी मंदिर, दापोडी येथील फिरंगाई देवी मंदिर, आकुर्डी येथील तुळजाभवानी माता, लिंकरोड येथील कालिकामाता मंदिर, तसेच शहरातील विविध भागांमधील ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये विधीवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांकडून सायंकाळी मिरवणूका काढून वाजतगाजत देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. नवरात्रौत्सव मंडळांसह गृहरचना सोसायट्यांनीही रास गरबा व दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने शहरवासियांच्या उत्साहाला भरते आले आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)