उद्योगनगरीतील उपनगरात देखावे खुले

यंदा हलत्या देखाव्यांवर भर : पौराणिक देखाव्यांमध्ये वाढ

पिंपरी – शहरातील गणेश मंडळाच्या देखाव्यांची तयारी पूर्ण झाली असून उपनगरातील मंडळांनी पहिल्याच दिवसापासून देखावे खुले केल्याचे पहायला मिळत आहे. यंदा हलत्या देखाव्यांवर भर आहे. पौराणिक देखाव्यांची संख्या वाढल्याचेही दिसून येत आहे.

एका दशकापूर्वी पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक यायचे. शहरातील नागरीक आणि बाहेरुन येणारे गणेशभक्‍त यांचे मुख्य आकर्षण असायचे संगीतावरील विद्युत रोषणाई आणि हलते देखावे. हळूहळू हे देखावे कमी होत गेले. परंतु, आता पुन्हा एकदा पौराणिक कथांवर आधारित हलत्या देखाव्यांवर मंडळे भर देऊ लागली असल्याचे दिसत आहे. कित्येक मंडळांनी यावर्षी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत हलत्या देखाव्यांना प्राधान्य दिले आहे. हलते देखावे गणेशभक्‍तांना मंडळांसमोर खिळवून ठेवण्यात सक्षम असल्याचे गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रामायण, महाभारत आणि अन्य पुराणांमधील कित्येक घटनांनी मूर्तस्वरुप देत हे देखावे सादर केले जात आहेत. लाइट इफेक्‍ट, निवेदन आणि चांगली साउंड एडिटिंग याच्या जोरावर हे देखावे पुन्हा एकदा लोकप्रिय होऊ लागले आहेत. कार्यकर्ते, मूर्तीकार, टेक्‍निशियन या सर्वांनीच आपले कसब पणाला लावून देखाव्यांमध्ये जिवंतपणा ओतण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. अद्यावत टेक्‍नोलॉजीच्या जोरावर अत्यंत सुंदर असे साउंड आणि लाइट इफेक्‍ट देण्यात आल्यामुळे कित्येक देखावे तर दर्शकांच्या अंगावर रोमांच उभे करत आहेत. विशेषत: बच्चे कंपनींना हे प्रयोग भलतेच आवडत असल्याचेही दिसत आहे.

उपनगरांमध्ये 5 ते 7 दिवसांचा गणपती बसवला जात असल्यामुळे सांगवी, भोसरी, चिखली, चऱ्होली, मोशी, रावेत आदी भागातील सर्व मंडळांनी पहिल्याच दिवशी आपले देखावे तयार ठेवले होते. गणेशचतुर्थी यंदा शुक्रवारी आल्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी अर्थात सुरुवातीच्या दोन दिवसांतच देखावे पाहण्यासाठी चांगली गर्दी झाल्याचे दिसत होती. राक्षसाचा आवाज, ऋषिंचा मंत्रोच्चार, पौराणिक पात्रांमधील संवाद, अचानक सुरु होणारे युद्ध किंवा दिसणारा चमत्कार बच्चे कंपनींना भलताच आवडत आहे. काही नवीन तरुणही देखावे आर्वर्जून पाहताना दिसतात. नव्या आणि कॉन्वेंटमध्ये शिकलेल्या पिढीला यापैकी बहुतेक पौराणिक कथा माहिती नसल्यामुळे ते ही आवडीने हे देखावे पाहत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जुन्या हलत्या देखाव्यांना सुगीचे दिवस आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)