उद्यानाच्या आरक्षणात मंदिरांचे बांधकाम

पिंपरी – दिघी येथील सर्व्हे क्रमांक 78 मध्ये गायरान जमिनीवर महापालिकेने उद्यानाचे आरक्षण निश्‍चित केले असताना देखील येथे देव-दैवतांची मंदिरे उभारली असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वसंत रेंगडे यांनी केली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात रेंगडे यांनी म्हटले आहे की, दिघी गावाची लोकसंख्या सुमारे 60 हजार एवढी आहे. या भागात बालोद्यान किंवा उद्यान नाही. त्यामुळे नागरिकांना विरंगुळा घेण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही. उद्यान बनविण्यासाठी पालिकेने दिघी सर्व्हे क्रमांक 78 मधील सरकारी गायरान जागेत उद्यानाचे आरक्षण निश्‍चित केले. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतुदही केली आहे. याठिकाणी उद्यान होणे अपेक्षित आहे.

उद्यानाच्या आरक्षित जागेत अतिक्रमण करून देव-देवतांची मंदिरे बांधली आहेत. या भागातील नागरिकांना उद्यानात जाण्यासाठी भोसरीत जावे लागते. न्यायालयाने मंदिरे बांधताना परवानगी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे उल्लंघन करून देवांची मंदिरे बांधली जात आहेत. या अतिक्रमणामुळे नागरिकांना विरंगुळा घेण्यासाठी कोठे जायचे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने हे अतिक्रमण हटवून उद्यान विकसित करावे, अशी मागणी रेंगडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)