उद्धव ठाकरे 25 जूनला पुणतांबेत

नगर – शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे 25 जून रोजी पुणतांबेत येत आहेत. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी या ठिकाणी पडल्याने राज्यातील शेतकऱ्यांची प्रातिनिधीक भेट म्हणून त्यांचा दौरा असल्याचे सांगण्यात येते. समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव तालुक्‍यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांशी देखील ठाकरे चर्चा करणार आहेत. सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी दौऱ्याच्या तयारीला लागले आहेत.
ठाकरे हे निफाड (जि. नाशिक) येथूून येवल्याला येणार आहेत. तेथूून शिर्डी येथे साईदर्शन घेऊन थेट पुणतांबे येथे ते दाखल होतील. दौऱ्यात त्यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री रामदास कदम,खासदार विनायक राऊत राहणार आहेत. खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर नगर) रावसाहेब खेवरे ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर तयारीला लागले आहेत. मंगळवारी (दि. 20) ते पुणतांबे येथे शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत.

कर्जमाफीच्या मुद्‌द्‌यावर शिवसेनेने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्याचबरोबर जिल्ह्यात या प्रश्‍नावरून ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला होता. त्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह भरला आहे.
दरम्यान, कर्जमाफीचे निकष ठरविण्यासाठी लागणारा संभाव्य कालावधी लक्षात घेता शेतकऱ्यांना खरीप पेरण्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात 10 हजार रुपयांची उचल द्यावी, अशी शिवसेनेने मागणी केली होती. सरकारने त्यासंबंधीचे आदेश काढले असले तरी प्रत्यक्षात मात्र कार्यवाही न झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांत मोठा संताप आहे. अशावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
याच दौऱ्यात ठाकरे हे कोपरगाव तालुक्‍यातील समृद्धी महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची जंगलीमहाराज आश्रमाजवळ भेट घेणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ पुणतांबे येथेही येणार आहे. मागील महिन्यात उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यावेळी तेथील प्रकल्पबाधितांशी चर्चा करत सेना शेतकऱ्यांबरोबर असून इंचभरही जमीन संपादित होऊ देणार नाही, असा धमकीवजा इशारा सरकारला दिला होता. नाशिक येथेही शिवसेनेने समृद्धी महामार्गावरून केलेल्या आक्रमक आंदोलनानंतर आता नगर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. पुणतांबे येथून संध्याकाळी ठाकरे हे औरंगाबादला रवाना होतील.

सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी आम्ही आग्रही होतो. कर्जमाफी, तसेच समृद्धी महामार्गाच्या प्रश्‍नावर आम्ही शेतकऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत. त्यासाठीच उद्धव ठाकरे पुणतांबे दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यासाठी आम्ही विशेष पाठपुरावा केला होता.
रावसाहेब खेवरे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (उत्तर नगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)