कडेकोट बंदोबस्त : राम जन्मभूमीला चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा
अयोध्या (उत्तर प्रदेश) – भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी रविवार, दि. 25 नोव्हेंबरला शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “चलो अयोध्या’ हा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढत आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ड्रोन कॅमेराने निगराणी करण्यात येत असून राम जन्मभूमीला चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा दिला आहे.
उद्धव ठाकरे उद्या (24 नोव्हेंबर) अयोध्येत दाखल होत असून या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उत्तर प्रदेश पोलिसांकडून पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. “लक्ष्मण किला’वर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होणार आहे.
रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहे. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. “लक्ष्मण किला’वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.
तर अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध , तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
“अयोध्या विशेष ट्रेन’ युपीत दाखल
ठाणे येथून निघालेली शिवसेनेची अयोध्या विशेष ट्रेन उत्तर प्रदेशात दाखल झाली आहे. अलाहाबाद रेल्वे स्टेशनात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ट्रेनने प्रवेश केला. या स्टेशनवर “प्रभू रामाचा जयघोष करणारी भजने गात व घोषणा देत शिवसैनिकांनी स्टेशन परिसर दणाणून सोडला. या स्टेशनमध्ये शिवसेनेची अयोध्या विशेष ट्रेन प्रवेश करत असताना ट्रॅकच्या दुतर्फा आणि स्टेशनवरही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात होते. पोलिसांकडून ट्रेन तसेच स्टेशनवरील वातावरणाचेही चित्रीकरण करण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा