उद्दिष्टांचे इमले; लागवडीची “माती’

झाडे लावायची, पण कोठे? : जागाच नसल्याचे कारण


“टार्गेट’च्या एकतृतीअंशच होणार रोपांची लागवड


पालिकेलाच भेडसावतोय जागेचा प्रश्‍न; नागरिकांचे काय?

पुणे- राज्यातील हरित आच्छादन वाढावे, यासाठी दरवर्षी राबविण्यात येणारा “वन महोत्सव’ यंदाही 1 जुलै रोजी होणार आहे. यांतर्गत यंदा पुणे महापालिकेतर्फे सुमारे 20 हजार रोपे लावली जाणार आहे. विशेष म्हणजे, 60 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने दिले आहे. पण, जागेअभावी फक्‍त 20 हजार झाडे लावणे शक्‍य आहे, असे लंगडे कारण महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने दिले आहे. त्यामुळे महापालिकेलाच जर जागेचा प्रश्‍न भेडसावत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी झाडे लावायची कोठे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

वन महोत्सवांतर्गत राज्य शासनाचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, विविध औद्योगिक आणि स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांतर्फे वृक्षारोपण केले जाते. यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक उद्दिष्ट देण्यात येते. यंदाही असेच उद्दिष्ट राज्यसरकारने दिले आहे. याबाबत प्राधिकरण अधिकारी दयानंद घाडगे म्हणाले, “वृक्षारोपणासाठी महापालिकेला 60 हजार झाडांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ही झाडे स्थानिक प्रजातींची असावीत, असा पर्यावरणप्रेमींचा आग्रह आहे. अशा झाडांची वाढ होताना त्यांच्या घेर वाढतो त्यामुळे त्यांना जास्त जागेची गरज असते. मात्र, जागेच्या अभावामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे लावणे शक्‍य होणार नाही. यापैकी बहुतांश ठिकाणी जागांची निश्‍चिती झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यासाठी आवश्‍यक रोपांची खरेदी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. विविध ठिकाणी खड्डे खणण्याचे काम सध्या सुरू असून पावसाळ्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे.”

अवास्तवी “टार्गेट
वनमहोत्सवातील वृक्षारोपणासाठी महापालिकेला 60 हजार रोपे लावण्याचे “टार्गेट’ आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक जागा उपलब्ध नसल्याने केवळ 20 हजार रोपे लावली जातील. गेल्या वर्षीदेखील प्राधिकरणाने 15 हजार रोपे लावली. रोपे लावण्यासाठीचे “टार्गेट’ देताना राज्य सरकारने प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करावा, असे वृक्ष प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले आहे.

“टेंडर’ प्रक्रियेने रोपांची खरेदी
छोटी रोपे लावल्यावर त्यांच्या संरक्षणासाठी लोखंडी जाळी बसवावी लागते. अशा रोपांच्या वाढीसाठी बराच कालावधी लागतो. तसेच ही रोपे जगण्याचे प्रमाण कमी असते. यावर उपाय म्हणून यंदा मोठी रोपे अथवा फांद्यांची लागवड केली जाणार आहे. मात्र, स्थानिक नर्सरीमध्ये अशी मोठी रोपे उपलब्ध नसल्याने ती आंध्रप्रदेशातून मागविण्यात आली आहे. यासाठी टेंडर प्रक्रियेद्वारे 300 रुपयांस एक, याप्रमाणे 15 लाखांच्या रोपांची “ऑर्डर’ देण्यात आली आहे.

इतर विभागांकडून जागानिश्‍चिती नाही
जुलैमध्ये वृक्षारोपणासाठी महापालिकेसह सर्व शासकीय कार्यालयांचे स्वरूप आणि मनुष्यबळ विचारात वृक्षारोपणाचे ठराविक उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, वनविभागवगळता इतर विभागांकडून फारसा प्रतिसाद दिला जात नाही. इतकेच नव्हे, तर या उपक्रमासाठी बहुतांश विभागाकडून अजून जागाही निश्‍चित झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सर्व विभागांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असा आदेश देऊन पंधरवडा उलटला, तरी तो सादर झालेला नाही.

येथे होणार वृक्षारोपण :
परिसर रोपांची संख्या
कात्रज- राजीव गांधी उद्यान – 500
धनकवडी – 500
सिंहगड रस्ता – 1500
कर्वे रस्ता – 8000
कोथरूड-बावधन- औंध-बाणेर – 4000
येरवडा- नगर रस्ता – 7000


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)