उदापूर, आंबेगव्हाण, पाचघर, पिंपरी पेंढारमधील अतिक्रमणे हटवली

ओतूर, -लोकशासन जनआंदोलन संघटनेच्या वतीने जुन्नर तालुक्‍यातील वन विभागाच्या जमिनीवरील केलेली अतिक्रमणे आज (शुक्रवार, दि. 19) पासून हटवण्यास वनविभाग जुन्नरकडून सुरुवात करण्यात आली. जुन्नर वनविभागाने ही कारवाई करताना महसूल विभाग, पुणे ग्रामीण पोलीस व राज्य राखीव दल (एसआरपी) यांचे सहकार्य घेतले. जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असून तालुक्‍यातील सर्वच अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.
याबाबत जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे म्हणाले, जुन्नर तालुक्‍यात वनविभागाची 22 हजार हेक्‍टर जमीन असून त्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून लोकशासन जनआंदोलकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अतिक्रमण करताना येथील मोठमोठी झाडे तोडून जेसीबी व ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात शेतजमीन तयार करण्यात आल्या. मागील अनेक वर्षांपासून वन विभागाच्या राखीव जमिनींवर फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून ते काढण्यासाठी वन विभागाच्या वतीने अनेक प्रयत्न करण्यात आले होते, मात्र त्यात आंदोलनकर्त्यांकडून अडथळे येऊन त्यांच्याबरोबर संघर्ष व वाद होत असे. वनविभागाने अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्या जागी अतिक्रमणे होत असत. ही बाब लक्षात आल्यावर ही अतिक्रमणे कायमचीच हटवायची असल्याने आम्ही राज्य राखीव दल, महसूल व पोलीस प्रशासनाची मदत घेतली आहे.
आज सकाळी 10 वाजता ह्या मोहिमेस सुरवात करण्यात आली. प्रथम गट क्रमांक 18 राखीव वनक्षेत्र उदापूर (ता. जुन्नर) मधील अतिक्रमण काढण्यास सुरवात केली तेथील 22 झोपडीवजा घरे काढण्यात आली. पोलीस फौजफाटा, महसूल व वनकर्मचारी यांच्या उपस्थित व जेसीबी, ट्रॅक्‍टर या यंत्र सामग्रीच्या साहाय्याने येथील जमिनीत चर व खड्डे घेऊन त्याठिकाणी नवीन वृक्षलागवड करण्यात आली. ही जागा रोपवाटिकेसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील वनविभागाच्या जागेतील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. येथील 10 झोपडीवजा घरे जमीनदोस्त करण्यात आली. त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करून त्यांच्या साहाय्याने ही घरे बांधली गेली होती. त्या वनातील तोडलेली लाकडे जप्त करून जुन्नर येथे पाठवण्यात आली. त्यानंतर पाचघर (ता. जुन्नर) येथील अतिक्रमण काढण्यात आली. त्यात चार झोपडीवजा घरे काढून टाकण्यात आली आहेत. शेवटी दुपार चार वाजता पिंपरी पेंढार येथील कच्ची मातीची 36 घरे जमीनदस्त करण्यात आली. ही अतिक्रमण विरोधी कारवाई यापुढे आठवडाभर सुरू ठेवण्यात येणार असून जोपर्यंत तालुक्‍यातील संपूर्ण अतिक्रमण काढून होत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. अजून पुढील काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे. या सर्व कारवाईसाठी पुणे जिल्ह्यातील सातशे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

  • असा होता बंदोबस्त
    प्रांत कल्याण पांढरे, जुन्नरचे तहसीलदार महेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तेजस्वी सातपुते, जुन्नर पोलीस उपविभागीय अधिकारी जयश्री देसाई, जुन्नरचे उपवन संरक्षक अर्जुन म्हसे, सहायक उपवनसंवक्षक वाय. पी. मोहिते, दयानंद घाडगे, पुणे येथील ई. डी. तेलंग, पोलीस निरीक्षक कैलास घोडके, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात, नारायणगाव पोलीस ठाण्याचे टी. वाय. मुजावर, पद्मभूषण गायकवाड तसेच पुणे ग्रामीणचे 10 पोलीस निरीक्षक, 20 पोलीस उपनिरीक्षक, 150 पोलीस पुरुष कर्मचारी, 88 महिला कर्मचारी, राज्य राखीव दलाची ठाणे व पुणे येथील तुकडी, तसेच जुन्नर, ओतूर, मंचर, खेड, चाकण, शिरूर, घोडेगाव, पुणे व भोर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व वनविभागाचे 350 कर्मचारी, 20 जेसीबी व 20 ट्रॅक्‍टर अशी कुमक या अतिक्रमण विरोधी कारवाई वेळी पाचारण करण्यात आली होती. या धडक कारवाई मुळे येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी दैनिक प्रभातने या अतिक्रमणांबद्दल वृत्त छापल्याने त्यांनी आभार मानले.

वनकायदा 1927, वन संवर्धन अधिनियमन 1980 अन्वये वन जमिनीवरील वृक्षतोड करणे, वनात अतिक्रमण करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असून यासाठी तीन वर्षे कैद होऊ शकते. शासनाने वनविभागास अतिक्रमण हटवण्यास सक्त आदेश दिले असून नव्याने अतिक्रमण होऊ नये, अशी सक्त ताकीद दिली आहे. ज्या ठिकाणी अतिक्रमणे आहेत त्या ठिकाणी ती निष्कशीत करून नवीन वृक्ष लागवड करून तसेच रोपवाटिका तयार करून त्यातील रोपे नागरिकांना योग्य दरात उपलब्ध करून दिली जातील. पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून योग्य ती मदत मिळेल त्यांनी कुणाच्या भूल थापाना बळी पडू नये तसेच आंदोलन कर्त्यानी गोरगरीब आदिवासी लोकांची दिशाभूल न करता त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे
-कल्याण पांढरे, प्रांताधिकारी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)