उदयनराजे यांच्यासाठी इतर पक्षातील मित्र आले धाऊन

आठवले, राणे यांची लोकसभेची उदयनराजेंना ऑफर

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या तिकिटाची सर्वपक्षीय राळं उठण्यास सुरवात झाली आहे. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत खासदार उदयनराजे यांच्या नावाला विरोध झाल्याने भाजपसह स्वाभिमानी,रिपब्लीक पार्टी ऑफ इंडिया पक्षाने उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी दाखवली आहे. लोकसभा उमेदवारी वरुन सुरू झालेल्या रस्सीखेचमध्ये भाजप व राष्ट्रवादी यांच्यातील राजकीय संघर्षाला धार आली आहे. सातारा आणि वाई या दोन विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ घडवण्याचे भाजपचे मनसुबे आहेत त्यासाठी एकीकडे मदन भोसले व दुसरीकडे उदयनराजे भोसले यांना गाळाला लावण्याच्या प्रयत्नात “दादा’ मंडळी आहेत.

-Ads-

लोकसभेला भक्कम उमेदवार म्हणून भाजप व राष्ट्रवादी सध्या राजकीय पेचात आहे. पवारांची पाठराखण पण आमदारांचा विरोध असा गोंधळ राष्ट्रवादीच्या तंबूत आहे. तर भाजपकडे सातारा लोकसभा व विधानसभा मतदारसंघासाठी ताकतीचा राजकीय चेहरा नाही. त्यामुळे उदयनराजेंनाच भाजपामध्ये ओढून थोरल्या पवारांना धोबीपछाड देण्याची रणनीती आखली जाऊ लागली आहे. पण शरद पवारांचा अप्रत्यक्ष हात उदयनराजे यांच्यासमवेत आहे, राष्ट्रवादीने उदयनराजे यांना तिकिट दिल्यास भाजपचे पांढरे निशाण उभे राहतय की काय ? त्यासाठी थेट भाजप प्रवेशाची खुली ऑफर देण्याचे तंत्र भाजपकडून सुरू झाले असून कोल्हापूर प्रमाणे साताऱ्याचा पेच थोरल्या पवारांना चिंतेत टाकणारा आहे.

भाजपच्या हायकमांड कडून विशेष नियोजन –
सातारा लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून राष्ट्रवादीचा दबदबा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उदयनराजे भोसले यांचे मैत्रीपूर्ण संबंध राजकीय वर्तुळात परिचित आहेत. त्यामुळे भाजपच्या रणनीतीचा थांग शेवटपर्यंत द्यायचा नाही असा थेट संदेश आल्याने भाजपच्या ज्येष्ठांनी चुप्पी साधली. अगदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवले आहे. पण राष्ट्रवादीला डिवचण्यासाठी उदयनराजेंना थेट ऑफर देण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. डॉ. दिलीप येळगावकर यांनी साताऱ्यात उदयनराजें यांना भाजपकडून थेट ऑफर दिली. तर नितेश राणे यांच्या स्वाभिमान पक्षाकडूनही उदयनराजे यांना विचारणा झाली आहे. सर्व पक्षात माझे मित्र आहेत या उदयनराजे यांच्या सूचक विधानाचा राजकीय अन्वयार्थ समोर येऊ लागला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही उदयनराजे यांना तिकिटासाठी पक्षदार खुले केल्याने उदयनराजे यांचे राजकीय मेरीट काय आहे ? याची झलकच मुंबई ते सातारा या दरम्यान दिसू लागली आहे.

मदन भोसलेचाही राजकीय विजनवास संपणार ?
कॉंग्रेसचे माजी आमदार व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचेही नाव भाजपच्या रडारवर आहे. वाईतही राजकीय बेरीज करण्याचे थेट मुख्यमंत्र्याची रणनीती आहे. शिवाय उदयनराजेंना पर्याय म्हणून ते राष्ट्रवादीच्याही रडारवर आहेत. जिल्ह्याच्या राजकीय राजकारणाचा प्रवास कसा होईल याचा आत्ताच अंदाज बांधणे कठीणं आहे. हे निवडणुकीवेळीच समजणार असले, तरी या चर्चांमुळे राजकीय जाणकारांना पटाची मांडणी करायला नवा मुद्दा मिळाला आहे, हे नक्की.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी संघटित बहिष्कार टाकला. अगदी पारावर बसून राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्यांपासून प्रत्यक्ष राजकीय प्रक्रियेच्या जवळपास असणाऱ्या सर्वांना ठोकताळे मांडण्यासाठी हा मोठा मुद्दा मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवाराबाबतच्या चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रवादी उदयनराजेंना उमेदवारी देणार का, दिली तर आमदार काय करतील, शिवेंद्रसिंहराजेंची काय भूमिका असणार, यावर तर्कांचा किस निघत होता. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली, तर उदयनराजे काय करतील, त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत, भाजप त्यांना तिकीट देईल का, ते दिले तर उदयनराजेंच्या समोर काय अडचणी असतील, भाजपच्या तिकिटाने त्यांना काय फायदा होईल, भाजपला किती मतदारसंघांत फायदा होईल, राष्ट्रवादी किती विधानसभा मतदारसंघांत अडचणीत येऊ शकते, याचीही गणिते मांडली जात आहेत.

त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा शहराची हद्दवाढ व मेडिकल कॉलेजच्या प्रत्यक्ष कामाची सुरवात ही अस्त्र भात्यात राखून ठेवली आहेत. उदयनराजे यांचे छत्रपती ही पारंपरिक बिरुदावली हा साताऱ्याच्या अस्मितेचा व राजकारणाचा मोठा यूएसपी आहे. त्यात पश्‍चिम महाराष्ट्रात उदयनराजें यांचे उपद्रवमूल्य मोठे असल्याने पवारांनी जिल्हा परिषदेच्या मैदानावर दहा वर्षापूर्वीच त्यांना राष्ट्रवादीसाठी बुकं करून टाकले. त्यासाठी भाजपने उदयनराजे यांना गळाला लावण्यासाठी व्यूहरचना केली आहे.

सातारा लोकसभा निवडणुकीचा राजकीय आखाडा व संभाव्य उमेदवारी यांच्या रणनीतीची चर्चा गती पकडू लागली आहे. राजकीय पटलावरील आखणीच्या, उलथापालथीच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मदन भोसले भाजपकडून उतरलेच तर, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, आमदारांची नाराजी आणि मदन भोसलेंसारखा उमेदवार समोर आल्यास उदयनराजेंची उमेदवारी डावलली जाऊ शकते. अशा परिस्थितीत उदयनराजे काय भूमिका घेणार, यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. निवडणुका जवळ आल्या की राजकीय चर्चा या होतच असतात. सर्वच चर्चा प्रत्यक्षात येतात असे नाही आणि कोणत्याच येत नाहीत असेही नाही.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)