उदयनराजेंकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी

आरोग्य सेवा चांगली न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा

सातारा – शासनाचे सार्वजनिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांसाठी फार महत्वाची आहे अशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन चांगले पैसे मोजत असतानाही, वैद्यकीय अधिकारी वेळेवर आणि जागेवर उपस्थित नसतील तर त्यांनी सरळ घरी बसलेले केव्हाही चांगले, अश्‍या शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी खरडपट्‌टी काढली.आरोग्य सेवा पुरवताना उपकाराची नव्हे तर सेवेची भावना ठेवा, सर्वसामान्यांना जी काही उपलब्ध असेल ती आरोग्य सेवा चांगल्या पध्दतीने द्या अन्यथा तुमच्यावर शासनामार्फत कारवाई करायला भाग पाडू अशा शब्दात त्यांनी रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधीताना चांगलेच फैलावर घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुसेगांव येथील रथोत्सवानिमित्त खासदार उदयनराजे भोसले हे पुसेगांवमध्ये आले होते. त्यानंतर ते रहिमतपूर येथे जाणार होते. मार्गावर अंभेरी घाटात एक आजारी वयस्कर आजी मदतीच्या प्रतिक्षेत होती. त्यांना तात्काळ उदयनराजेंनी गाडीत घेवून रहिमतपूर प्रा. आरोग्य केंद्रावर घेवून आले. रहिमतपूर येथे आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्यांना गर्दी दिसली. त्या अनोळखी आजींना प्रा.आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचाराकरता पाठविले.

प्राथमिक आरोग्य केंद्रावर झालेली गर्दी आणि खासदार उदयनराजेंना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहुन, केंद्रावर उपस्थित असणाऱ्या स्टाफची चांगलीच तारांबळ उडाली, अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावून बोलावण्यात आले.
तोपर्यंत खासदार उदयनराजे भोसले हे त्या ठिकाणी गर्दीने उपस्थित असलेल्या आजारी व्यक्‍तींची आस्थेवायिकपणे चौकशी करीत होते. या चौकशीत प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वारंवार अनुपस्थित असतात, वेळेवर कधीच आरोग्य सेवा मिळत नाही, अश्‍या तक्रारी करीत होते. तक्रारी अक्षम्य असल्याने, खासदार उदयनराजेंनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्याच्या सूचना केल्या.

सहावा वेतन आयोग पाहिजे, सातवा वेतन आयोग पाहिजे, मात्र आरोग्यसेवेचे महत्व कळत नाही का? वैद्यकीय शिक्षण घेताना पहिल्याच वर्षी जी शपथ घेतली जाते ती शपथ विसरलात का अश्‍या कठोर शब्दात कान उघाडणी करताना, जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर आणि योग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही का, आणि लक्ष नसेल तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर शासनामार्फत कारवाई करायला भाग पाडले जाईल अश्‍या खरमरीत शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी संबंधितांची चांगलीच कान उघाडणी केली.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आस्थेवाईक चौकशीमुळे उपस्थित आजारी व्यक्‍ती व त्यांचे नातेवाईक भारावून गेले होते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या अचानक एन्ट्रीमुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बोबडी वळाली तर कामचुकार व्यक्‍तींची गाळण उडाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)