उदंड झाला कचरा, कोणीतरी ही समस्या सोडवा! 

बुरूडगावचा कचराडेपो दहा महिन्यांपासून बंद, तर सावेडीच्या डेपोतून धुराचे लोट : खतनिर्मिती प्रकल्प बंद 

अन्‌ प्रश्‍नांचा नाही तुटवडा…

नगर: नगरमध्ये नेहमीच कचऱ्याची समस्या दिसते. ही समस्या मेट्रो शहरासारखीच नगरमध्ये वाढू लागली आहे. पुणे, औरंगाबाद व नाशिकसारखी ही समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धरू लागली आहे. शहरासाठी असलेल्या दोन कचरा डेपो आहेत. त्यातील एक कचरा डेपो मागील 10 महिन्यांपासून बंद आहे, तर दुसरा डेपो बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. अर्थात या मागणीमागे राजकीय वर्तुळ आहे.

नगर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट हा नेहमीचाच प्रश्‍न राहिलेला आहे. बुरूडगावकडील कचरा डेपोवरून हरित लवादाने महापालिकेने चांगलाच दणका दिला आहे. यातूनही महापालिका प्रशासनाला शहाणपण आलेले नाही. तिथे कचरा टाकता येईना म्हणून सावेडीतील कचरा डेपोकडे प्रशासनाने मोर्चा वळविला आहे. सावेडीतील कचरा डेपोची क्षमता ही कमीच आहे. येथे आता कचरा ओसंडून वाहू लागला आहे. हाच कचरा मध्यतंरी कोणीतरी पेटवून दिला होता. त्यामुळे धुराचे लोटच्या लोट उठले होते. ही आग अधून-मधून धुमसत राहतो. कधीही या आगीचे लोट उफाळून येतात. त्याचप्रमाणे ही समस्या पुन्हा उफाळून येते.

नगर शहरात प्रतिदिन सुमारे 150 टन कचरा पडतो. प्रशासनाकडे गोळा होणारा कचऱ्याचा हिशोब. शहरातील गल्लीबोळातील नाल्या, नाले, गटारी, ओढ्या-नाल्यांच्या पुलालगत पडून राहणार कचऱ्याचा हिशोब वेगळाच आहे. अशा आडठिकाणी पडणारा कचरा हिशोबात धरला जात नाही. तो दिवसेंदिवस तिथेच पडून राहतो. परिणामी तेथून दुर्गंधी पसरते. या कचऱ्यामुळे नगर शहरातील अस्वच्छता दिवसेंदिवस वाढत आहे. हाच विषय हेरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान देशभस सुरू केले. या अभियानात नगरचा नेहमीच खालचा क्रमांक राहिला आहे. यातून महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नगरकर बोध घेण्यास तयार नाहीत. कचरा ही समस्या म्हणजे ती पर्यावरणावर आणि त्यानंतर मानवावर परिणाम करणारे “स्लो-पॉयझन’ आहे. यावर आताच काम झाले नाही, तर हे पॉयझन नगरमध्ये पसरण्यास वेग लागणार नाही. काहीप्रमाणात हे पॉयझनचै फैलाव झाला आहे. जागोजागी पडत असलेला कचरा हे त्याचे प्राथमिक रूप आहे. तरी देखील त्यावर गांभीर्याने कोणताही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी दिसत नाही, हे नगकरांचे दुर्दैव आहे. स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना देशाच्या पंतप्रधानांनी मांडली, त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी देखील नगरच्या स्वच्छतेबाबत जागरूक दिसत नाहीत.

नगर शहरातील दोन कचरा डेपोपैकी बुरूडगाव रोडचा कचरा डेपो बंद आहे. त्यामुळे सावेडीतील कचरा डेपोत कचरा वेगाने वाढत आहे. या कचरा डेपोला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. मात्र, हा कचरा डेपो हलवून कोठे नेला जावा, याबाबत पर्यायच उपलब्ध नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. त्यामुळे कचरा डेपोबाबत प्रशासनाची भूमिका नेहमीच अस्पष्ट राहिलेली आहे. या कचरा डेपोप्रमाणेच शहरातील माळीवाडा येथील कचरा रॅम्प हलविण्यात देखील प्रशासन व विद्यमान सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. रॅम्प हालविण्याचे हे घोंगडे बऱ्याच वर्षाचे आहे. या रॅम्पसाठी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. परंतु हे काम कधी मार्गी लागणार हा प्रश्‍न आहे. हा कचरा रॅम्प शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्याभोवती शाळा, हायस्कूल, छोटे-मोठे व्यवसायिक, क्रीडा संकुल, बसस्थानक, मानाचं ग्रामदैवतासह मोठी बाजारपेठ आहे. तरी देखील त्यावर कार्यवाही झाली नाही.

महापालिका प्रशासनाने दोन्ही कचरा डेपोंमधील सुविधांसाठी कोट्यवधीचा खर्च केला आहे. कचरा डेपोंमुळे परिसरात पसरत असलेल्या दुर्गंधीवरही महापालिका काहीच ठोस उपाय करीत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
बुरुडगावच्या कचरा डेपोत कचऱ्यामुळे तसेच मृत जनावरांचे अवशेष आणून टाकण्याच्या प्रकाराने मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला, त्याबरोबर कचऱ्यातील प्लास्टिक वाऱ्याने आजूबाजूच्या शेतजमिनीत जाऊन जमिनी नापीक होऊ लागल्याने येथील शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्यांनी हरित लवादाकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींची दखल घेतली गेली आहे. महापालिकेला येथे खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याबरोबरच डेपोला संरक्षक भिंत, कचऱ्यातील पाणी वाहून जाण्यासाठी गटार, अंतर्गत रस्ते, न कुजणारा कचरा डम्प करण्याची सुविधांवर भर देण्याचे सुचविले आहे.

यापैकी काही कामे झाली आहेत, तर काही सुरू आहेत; मात्र, या डेपोमधील कचऱ्यातून खतनिर्मिती प्रकल्प मागील 8-10 महिन्यांपासून बंद आहे. मर्जीतील ठेकेदाराला हे काम मिळण्यासाठी प्रशासन व राजकीय क्षेत्रातून रस्सीखेच सुरू असल्याचे हा खतनिर्मिती प्रकल्प देखील रंगाळलेला आहे. त्यामुळे सध्या केवळ सावेडी कचरा डेपोवरच कचरा आणून टाकण्याचे काम सुरू आहे. पण यामुळे परिसरातील दुर्गंधी वाढली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. येथे खत प्रकल्प सुरू असला तरी न कुजणारा कचरा जमिनीखाली डम्प करण्याची सुविधा सुरू झाली नसल्याने तो उघड्यावर टाकला जातो. परिणामी, वाऱ्यामुळे त्याची दुर्गंधी परिसरात आहे. काही जण बुरुडगाव डेपोप्रमाणे येथील कचराही पेटवून देतात, त्यामुळे धुराचे साम्राज्यही या परिसरात असते.

कचरा डेपोच्या समस्येपासून राजकीय पक्ष अलिप्त 

सावेडी कचरा डेपोपासून होणाऱ्या त्रासापासून जनतेला वाचवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेन हे दोन्ही राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना सोडल्यास भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे राजकीय पक्ष मात्र या विषयापासून अलिप्त आहेत. दुसरीकडे सावेडी डेपोतील कचऱ्यातून खतनिर्मितीच्या प्रकल्पाची सुमारे 60 लाखांवर रक्कम थकल्याने संबंधित ठेकेदाराने काम थांबवण्याचे ठरवले आहे. यामुळे कचऱ्यातून खतनिर्मिती बंद पडली तर सर्व कचरा तसाच पडून राहून त्याची दुर्गंधीही वाढणार आहे. सर्व बाजूने सावेडी डेपोवर संक्रात आल्याचे दिसू लागले आहे. दरम्यान, सावेडी व बुरुडगाव कचरा डेपो हटवण्याची मागणी रहिवासी व राजकीय नेतेमंडळी नेहमी करतात. पण हे दोन्ही डेपो हटवून न्यायचे कोठे, याचा पर्याय कोणीही समोर आणत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)