उत्सुकता भविष्याची…(25 ते 1 जुलै 2018 पर्यंतचे ग्रहमान)

अनिता केळकर

राशीच्या लग्नात हर्षल, तृतीयेत रवी, चतुर्थात शुक्र, राहू व बुध, सप्तमात गुरु वक्री, भाग्यात प्लूटो व शनी वक्री, दशमात वक्री मंगळ व केतू तर लाभात नेप्चून वक्री आहे. सप्ताहात माणसांची पारख होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा, नवीन कामाचा विस्तार करण्याचा बेत मनात घोळेल. पण शांत व संयमी वृत्ती ठेवून ज्येष्ठांचा सल्ला घ्या मगच पावले उचला. 
मेष : आर्थिक लाभ होतील 
राशीला अनुकूल रवी, मंगळ, शुक्र असल्याने कामे यशस्वी होतील. मात्र गुप्त शत्रूंपासून सावध रहा. व्यवसायात माणसांची पारख करणे महत्त्वाचे राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. नवीन विस्ताराचे बेत मनात घोळतील. नोकरीत पैशाच्या मोहापायी वातावरणापासून दूर रहा. आर्थिक लाभ होतील. महिलांचा घरासाठी खर्च होईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये.
शुभ दिनांक : 28, 29, 30, 1
वृषभ: नवीन ओळखी होतील 
बराच काळ रेंगाळलेल्या कामांना गती येईल. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. पूर्वी केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत परदेशगमनाचे योग. कामामुळे नवीन ओळखी होतील. ओळखीमुळे पुढे जावून फायदा होणार आहे. नोकरदार महिलांना कामातील कौशल्य दाखवता येईल. कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. मनाप्रमाणे वागता येईल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
शुभ दिनांक : 25, 26, 27, 30, 1
मिथुन : अलिप्त धोरण ठेवावे 
महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. अनपेक्षित कामे मिळतील. नोकरीत नवीन कामामुळे दगदग, धावपळ वाढेल. नोकरदार महिलांना कामाचा कंटाळा आला असेल तर मित्रमैत्रिणींसमवेत छोटी सहल काढावी. आरोग्यास जपावे. विनाकारण धाडस करून नये. महिलांनी अलिप्त धोरण ठेवावे. वादविवाद टाळावेत. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास करणे आवश्‍यक.
शुभ दिनांक : 28, 29
कर्क : कामाचा उरक दांडगा 
व्यवसायात ध्येयधोरणे ठरवून कृती कराल. स्वत:ची कुवत ओळखून कामे स्वीकारा. कामे स्वीकारताना मात्र अति आत्मविश्‍वासाने धाडस टाळावे. कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांची मदत मिळेल. जोडधंद्यातून विशेष लाभ संभवतो. घरात महिलांना आवडत्या छंदात मन रमविता येईल. कामाचा उरक दांडगा राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पूरक ग्रहमान.
शुभ दिनांक : 25,26,27,30,1
सिंह : कामातील बेत गुप्त ठेवा 
कामाच्या बाबतीत घेतलेले निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. नवीन घडामोडी घडतील. नोकरीत सहकाऱ्यांवर विसंबून राहू नका. दगाफटका होण्याची शक्‍यता आहे. कामातील बेत गुप्त ठेवा. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांनी वादविवाद टाळावेत. हट्टी, हेकेखोर स्वभावाला बंधनात ठेवावे. विद्यार्थी, कलावंत, खेळाडूंना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 25,26,27,28, 29
कन्या : आर्थिक अवक सुधारेल 
महत्त्वाच्या ग्रहांची साथ मिळेल. स्वप्ने साकार होतील. व्ववसायात अति उत्साहापोटी नवीन कामे स्वीकाराल. केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत आर्थिक आवक सुधारेल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. कामात बढतीचे योग. लांबच्या प्रवासाचे बेत निश्‍चित होतील. महिलांना अपेक्षित चांगली बातमी कळेल. आनंद व उत्साह वाढेल. घरात नवीन खरेदीचे बेत सफल होतील. तब्येतीची साथ मिळेल.
शुभ दिनांक :25,26,27,28,29,30,1
तूळ : कर्तव्यतत्पर रहा 
कामात उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. जुनी येणी वसुल होतील. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची साथ मिळावी. कर्तव्यतत्पर रहा. घरात महिलांना संततीबाबत चांगली बातमी कळेल. प्रियजनांच्या गाठीभेटीने आनंद मिळेल. मनोस्वास्थ्य प्रसन्न राहिल. अनावश्‍यक खर्च टाळावेत. विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा.
शुभ दिनांक :25,26,27,28,29,30,1
वृश्‍चिक : आप्तेष्टांच्या भेटीचे योग 
व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील. आर्थिकबाबतीत मात्र फारशी हालचाल नको. नोकरीत तुमच्या कामामुळे तुमचे महत्त्व वरिष्ठ व सहकाऱ्यांना कळून येईल. बेकार व्यक्तींनी अतिचिकित्सा न करता नोकरी स्विकारावी. येणारी संधी सोडू नये. महिलांचा मूड बदलता राहील. कामाचा झपाटा वाखाणण्याजोगा असेल. आप्तेष्टांच्या भेटीचे योग.
शुभ दिनांक :25,26,27,28,29,30,1
धनु :मौनव्रत सांभाळा 
कामाचे व पैशाचे नियोजन योग्य करून कामाता उलाढाल वाढवाल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क रहावे लागेल. कामातील बदल भविष्यात लाभदायी ठरेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळणे महत्त्वाचे. कामात कमीत कमी चुका करून प्रगती करा. मौनव्रत सांभाळा. महिलांनी अगोचरपणा कमी करावा. पूर्वी काही कारणाने लांबलेल्या प्रश्‍नांकडे लक्ष द्याल. मनन व चिंतन करावे.
शुभ दिनांक : 28,29,30,1
मकर : अर्धवट कामे मार्गी 
महत्त्वाकांक्षा व जिद्द बाळगून अर्धवट कामे मार्गी लावाल. कर्तव्यात कसूर नको. व्यवसायात पैशाचे व्यवहार करताना दक्ष रहा. नोकरीत हलके कान ठेवून गैरसमजुतीचे घोटाळे टाळा. कामाचा वेग वाढता राहील. महिलांनी तब्येत सांभाळून दगदग, धावपळ करावी. सलोख्याचे संबंध ठेवावेत. आवडत्या छंदात मन रमवावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यास सखोलतेने करावा. तरुणांनी लहरीपणा टाळावा.
शुभ दिनांक :25,26,27,30,1
कुंभ : नवीन खरेदी होईल 
ग्रहमान व वातावरणानुसार ध्येयधोरणात बदल कराल. व्यवसायात लवचिकता आणून स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न कराल. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रीत कराल. अनावश्‍यक खर्च टाळा. नोकरीत तुमच्या तत्त्वाला मूरड घालून तडजोड करा. आळस झटकून कामाला लागा. महिलांना मुलांकडून प्रगतीची चांगली बातमी कळेल. नवीन खरेदी होईल. कामाचे समाधान मिळेल.
शुभ दिनांक :25,26,27,28,29
मीन : मन:शांती मिळेल 
नशिबाची साथ मिळाल्याने व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती कराल. पैशाची चिंता मिटेल. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ नवीन कामाची संधी देतील. नवीन काम करताना चुक होणार नाही याची खबरदारी घ्या. अनपेक्षित लाभाची शक्‍यता. बेकार व्यक्तींना कामधंदा मिळेल. महिलांना मन:शांती मिळेल. सलोख्याचे धोरण ठेवतील. तरुणांना नवीन व्यक्तींचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांना पूरक ग्रहमान.
शुभ दिनांक :25,26,27,28,29,30,1
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)