उत्सव संपण्यावर सिलिंडरवर कारवाई कागदावर

गणेशोत्सव संपण्यास दोनच दिवस शिल्लक : परवाने न घेताच खाद्यपदार्थ विक्री जोरात

पुणे – रस्त्यांवरच खाद्यपदार्थ तयार करून विकणाऱ्यांकडील सिलिंडर जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले होते. मात्र रस्तोरस्ती असे खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांची संख्या पाहिली असता काहीच कारवाई होत नसल्याचे उघड झाले आहे.

-Ads-

सुरक्षेच्या कारणास्तव विक्रेते रस्त्यावरच अनेक खाद्यपदार्थ तयार करून विकताना रस्तोरस्ती दिसत आहेत. उत्सवाच्या दहा दिवसांत तर नेहमीपेक्षा या विक्रेत्यांची संख्या दसपट वाढते. त्यामध्ये वडापाव, भजी, पराठा, थालीपीठ, चाट, अंडाभुर्जी, ऑम्लेट पाव, पावभाजी, साऊथ इंडियन पदार्थ, चाट, दाबेली, चायनीज, पुरीभाजी, छोले भटुरे विक्रेत्यांचा समावेश आहे.
या विक्रेत्यांना हंगामी पद्धतीने दहा दिवसांसाठीच परवानगी देताना त्यामध्ये तयार पदार्थ विकण्याची सक्ती करण्यात येते. हे पदार्थ त्यांनी घरून अथवा नियोजित स्थळातून बनवून विक्रीच्या ठिकाणी आणणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता हे पदार्थ गाड्यांवरच बनवले जातात आणि गरमागरम विकले जातात. ते तयार करताना सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत.

वास्तविक उत्सवाच्या काळात प्रचंड गर्दी असते. त्याच ठिकाणी हे विक्रेतेही उभे असतात. अशावेळी कोणती दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? यासाठी येथे पदार्थ बनवायचेच नाहीत, असा नियम महापालिकेने सुरू केला. असे पदार्थ बनवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहेच. परंतु या विक्रेत्यांना ज्या डिस्ट्रीब्युटरकडून सिलेंडर पुरवण्यात येतात. त्यांच्याकडून आणि मुख्यत्त्वे संबंधित गॅस कंपनीवरही फौजदारी दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

संपूर्ण पुण्यात गेल्या दहा दिवसांत गल्लोगल्ली, रस्तोरस्ती हे विक्रेते सध्या दिसून येत आहे. यांची संख्या हजारांमध्ये आहे. असे असताना केवळ काहीजणांवरच कारवाई करत 600 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. विक्रेत्यांच्या मानाने ही कारवाई नगण्य असून, उत्सव संपण्याला आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

आजपर्यंत आपण सुमारे 600 सिलेंडर जप्त केले आहेत. ही कारवाई केवळ उत्सवापुरतीच नसून, ती यापुढेही सुरू राहणार आहे. उत्सवाचे आणखी दोन दिवस आहेत, त्या दिवसात कारवाई करणार आहे.
– माधव जगताप, अतिक्रमण विभाग प्रमुख, मनपा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)