उत्पादनात, विक्रीत वाढ, मग रोजगार कोठे?

     अर्थसार

  यमाजी मालकर

एकेकाळी माणसाला सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करण्याची सक्‍ती होती. पण ते अमानवी आहे, हे याच समाजाने मान्य केले आणि दहा तास, आठ तास असे त्याचे कामाचे तास कायद्याने कमी केले. पण आता त्यातही बदल करण्याची वेळ आली आहे. कारण जी राक्षसी आणि चलाख यंत्रे त्याच्या स्पर्धेत उभी केली आहेत, त्यांची कार्यक्षमता माणसाच्या कितीतरी पट वाढली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणजे आयटीमध्ये जे इंजिनियर काम करतात, ते प्रामुख्याने अशी कामे करत आहेत, ज्यात काम करणाऱ्या माणसाची जागा यंत्र घेईल. आणि हे यंत्र असे असेल, जे माणसांच्या कितीतरी पट काम न थकता, बिनचूक करू शकेल. उदा. गुगल सध्या चालकविरहीत गाडी बनवीत आहे, जी गाडी चालविण्यासाठी चालक लागणार नाही. माणूस गाडीत जावून बसला आणि त्याने काही बटने दाबली की गाडी चालू लागेल. त्या गाडीत असे सॉफ्टवेअर असेल, ज्याला गाडी मालकाने गाडी कोठे न्यायची, हे ठिकाण सांगितले की गाडी त्याला तेथे नेऊन सोडेल. किंवा जपानमध्ये असे काही यंत्रमानव तयार करण्यात आले आहेत, जे माणूस करत असलेली कितीतरी कामे सराईतपणे करू लागले आहेत.

आतापर्यंत यंत्रमानव अशी कामे करत होता, जेथे एकसुरी काम आहे. पण आता एकसुरी नसलेली कामे पण तो करू लागला आहे. याचा अर्थ कोणते काम कसे करावे आणि ते करताना कोणती काळजी घ्यावी, हे त्याला म्हणजे त्याच्यात टाकलेल्या सॉफटवेअरला कळू लागले आहे. त्याला इंग्रजीत artificial intelligence असे म्हणतात. अमेरिका आणि युरोपियन देशांत अशा संशोधनावर जास्त जोर का देण्यात येतो आहे, या प्रश्नाचे एक साधे उत्तर आहे, त्या देशांची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे त्यांची कामे करण्यासाठी मनुष्यबळ मर्यादित आहे. शिवाय तेथे आर्थिक समृद्धी असल्याने शरीरकष्टाची कामे करण्यासाठी कोणी तयार नाही. ज्यांच्याकडून शरीरकष्टाची कामे करून घेतली जातात, त्यांना भरभक्‍कम मोबदला दिला जातो.

अशी कामे करण्यासाठी अमेरिकत मेक्‍सिकोतून लोक येतात. अमेरिकेतील भारतीय खरे म्हणजे श्रीमंत समूहात गणले जातात, पण ते सुद्धा परवडत नसल्याने, तेथे घरातील बहुतांश कामे आपली आपणच करतात. भारतात मात्र नेमके उलटे चित्र दिसते. आपली लोकसंख्या जास्त असल्याने आणि रोजगाराची संधी नसल्याने शरीरकष्टाची कामे करण्यासाठी भरपूर मनुष्यबळ उपलब्ध आहे. पण त्यामुळेच त्यांना त्या कष्टाचे मोल मिळत नाही. संघटीत क्षेत्रातील माणसांना तसेच व्हाईट कॉलर नोकरीच्या तुलनेने त्यांना खूप कमी मेहताना दिला जातो. पण जगातील गेल्या काही दिवसांतील बदलामुळे हे व्हाईट कॉलर रोजगारही संकटात सापडले आहेत. भारतासारख्या देशात हातांना काम देणे, ही सर्वाधिक महत्त्वाची गरज असताना ते होताना दिसत नाही. देशात मोठी अस्वस्थता वाढली असून या गहन समस्येवर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे इंजिनियर जोपर्यंत इतरांच्या हातातील काम काढून घेण्याचे काम करत होते, तोपर्यंत या विषयाचे गांभीर्य फारसे कोणाच्या लक्षात आले नाही. पण आता अशी वेळ आली आहे की जी कामे ते करत होते, त्यातील काही कामे त्यांनीच तयार केलेली सॉफटवेअर करू लागली आहेत. त्यामुळे या क्षेत्रात रोजगार संधी कमी होत असल्याची चिंता व्यक्‍त केली जाते आहे. अशीच एक धक्‍कादायक माहिती एका बातमीत अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. महात्मा गांधी यांचा यांत्रिकीकरणाला विरोध होता आणि त्यामुळेच त्यांनी स्वत:च्या हाताने आपल्याला हवे असलेले कापड विणले पाहिजे, असा आग्रह धरला. स्वातंत्रय चळवळीत खादीला त्यातून महत्व आले आणि स्वावलंबन तसेच यांत्रिकीकरणाच्या विरोधाचे ते हत्यार बनले. पण त्याच खादी उद्योगावर आता कोणती वेळ आली आहे पहा.

लोकसभेत देण्यात आलेल्या या माहितीनुसार 2015 ते 2017 या तीन वर्षांत खादी उद्योगात काम करणाऱ्या माणसांची संख्या 11.6 लाखांवरून 4.6 लाख इतकी कमी झाली आहे. पण खरा धक्का पुढेच आहे, तो असा की या काळात खादीचे उत्पादन 31.6 टक्‍क्‍यांनी वाढले तर विक्री तब्बल 33 टक्‍क्‍यांनी वाढली ! रोजगार कमी होण्याची कारणे शोधली जात आहेत, ज्यात एक मुद्दा असा सापडला की खादीसाठी जो पारंपरिक चरखा वापरला जात होता, तो आता वापरला जात नाही. आता अधिक वेगाने खादी विणणारा चरखा वापरला जातो. त्यामुळे काही माणसांची गरज कमी झाली, तर दुसरीकडे उत्पादन मात्र वाढले.

त्या माहितीत उल्लेख नाही, पण असेही झाले असणार की ही जी नव्या चरख्यावरील खादी आहे, ती कापडाचा दर्जा म्हणून अधिक चांगली असणार. त्यामुळे उत्पादन वाढले तसे त्याची विक्रीही वाढली. दर्जाही वाढतो आहे आणि उत्पादकताही वाढते आहे, यासाठी खादीचे उदाहरण पुढे आले, हा दुर्दवी योगायोग म्हटला पाहिजे. पण आपला मूळ मुद्दा आहे तो उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रात असेच काहीतरी होते आहे. उत्पादन वाढते आहे, त्यामुळे वस्तू आणि सेवांची मुबलकता आहे. अधिकाधिक उत्पादन आणि सेवा संघटित क्षेत्र काबीज करत आहेत. त्यामुळे संघटित क्षेत्रात अधिक पैसा फिरतो आहे आणि असंघटित क्षेत्रातील संपत्तीचा संकोच होऊ लागला आहे. त्याचा थेट परिणाम रोजगार संधी कमी होण्यात होतो आहे.

भारतात आठ तासाच्या ड्युटीऐवजी आता सहा तासांची ड्युटी असली पाहिजे, असा हा प्रस्ताव आहे. किमान संघटीत क्षेत्रापासून त्याची सुरवात केली पाहिजे, असा आग्रह अर्थक्रांती धरते आहे, त्याचे कारण सुरवातीला त्या क्षेत्रात हा बदल करणे सोपे आहे. इमारती आणि इतर भांडवली खर्चावर जेवढा खर्च सध्या केला जातो, त्या खर्चातून पुरेशी निर्मिती होण्यासाठी सर्व संघटित क्षेत्रात 12 तासांचे काम होण्याची गरज आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आता आहे, त्यापेक्षा दुप्पट नागरिकांना संघटित क्षेत्रात रोजगार मिळण्याची गरज आहे. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेला इतकी गती येईल की त्यातून ती अधिक सशक्‍त बनेल, अशी ही मांडणी आहे.

आठ तासांच्या ड्युटीऐवजी सहा तासांची ड्युटी हा बदल आज आमूलाग्र आणि अविश्‍वसनीय वाटत असला तरी (नोटाबंदीचा अत्यावश्‍यक बदलही असाच अशक्‍य वाटत होता.) रोजगार संधी वाढण्यासाठी त्याशिवाय पर्याय नाही, हे समजून घेतले पाहिजे. यांत्रिकीकरणाचा स्वीकार करायचा की नाही, हे आता आपल्या हातात राहिलेले नाही. त्यामुळे यंत्राची मदत घेऊन उत्पादनाचे आकडे फुगत चालले आहेत. पण ज्या वस्तू आणि सेवांची रेलचेल आहे, त्या वापरण्यासाठीची क्रयशक्तीच देशात राहिलेली नाही. कारण त्या तुलनेत नवा रोजगारच निर्माण होत नाही. माणसाला यंत्राशी स्पर्धा करायला लावून त्याचे जगणे आधुनिक काळाने शुष्क करून टाकले आहे. त्याला माणूस म्हणून जगण्यासाठीची स्पेस आधुनिक काळाने हिरावून घेतली आहे. त्यामुळेच दोन चार लाख रुपये दरमहा घरांत आणणाऱ्या तरुणांना कसे जगावे, हे कळेनासे झाले आहे.

अशा या बदलाला तेवढ्याच मोठ्या सकारात्मक बदलाने तोंड द्यावे लागणार आहे. एकेकाळी माणसाला सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करण्याची सक्‍ती होती. पण ते अमानवी आहे, हे याच समाजाने मान्य केले आणि दहा तास, आठ तास असे त्याचे कामाचे तास कायद्याने कमी केले. पण आता त्यातही बदल करण्याची वेळ आली आहे. आणखी एक. रोजगार वाढला पाहिजे, असे सर्वच म्हणतात. पण तो कसा वाढेल, याविषयी कोणी बोलत नाही. आठ तासांऐवजी सहा तास हा मात्र ठोस प्रस्ताव आहे. यापेक्षा चांगला प्रस्ताव ठेवून या समस्येला भिडण्याचे धाडस समाजातील विचारवंतानी केले पाहिजे, नाहीतर हा प्रस्ताव पुढे जाण्यासाठी सक्रिय झाले पाहिजे.

ymalkargmail.com


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)