उत्पन्न दाखल्याच्या अटीने आरटीई प्रवेशाची परवड 

 

पुणे – शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्‍के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. मात्र, आरटीईचे ऑनलाइन अर्ज करताना तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला बंधनकारक करण्याचा निर्णय ऐनवेळी शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी ऑनलाइन अर्ज भरताना नव्हे, तर प्रत्यक्ष शाळेत प्रवेश घेताना उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक होता. आता शिक्षण विभागाने घाईघाईने उत्पन्नाच्या दाखला अनिवार्य केल्याने आरटीई प्रवेशासाठी पालकांची परवड होणार असल्याची चिन्हे आहेत.

-Ads-

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश म्हणजेच कोणत्याही कागदपत्राची आवश्‍यक नसताना ही प्रक्रिया राबविणे. मात्र यंदा प्रवेश प्रक्रियेत बदल केल्याने ऑनलाइन प्रवेशाचा खेळखंडोबा होणार असल्याचे चित्र आहे. कारण यंदा ऑनलाइन अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केले आहे. त्याशिवाय आरटीई प्रवेशाचा अर्ज भरता येणार नाही. दरवर्षी ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कागदपत्राची आवश्‍यकता नव्हती. यंदा मात्र उत्पन्नाचा दाखला बंधनकारक केल्याने पालकांची ससेहोलपट होणार असल्याचे दिसून येत आहे.

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशा कमी वेळेत पालकांना उत्पन्नाचा दाखला कसे मिळणार, असा प्रश्‍न आहे. मुळात ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महिनाभर आधीच पालकांना उत्पन्नाचा दाखला आवश्‍यक असल्याची माहिती देणे अपेक्षित होते. मात्र राज्य शासनाने कोणतेही पूर्वकल्पना न देता हा दाखला आवश्‍यक केल्याने पालकांना आता उत्पन्नाचा दाखला काढायचा की अर्ज भरायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आरटीई प्रवेश लांबणीवर पडणार
आरटीई प्रवेशासाठी लवकरच ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. मात्र उत्पन्नाचा दाखला अनिवार्य केल्याने, त्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना उत्पन्नाचा दाखल्याची सक्‍त करू नये, असेच काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र राज्य शासनाने ही बाब बंधनकारक केल्याने अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आरटीई अर्जासाठी मुदतवाढ द्यावी लागेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.

‘त्या’ शाळांवर कारवाई होणार
सध्या आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात एकूण 946 शाळांमध्ये 25 टक्‍के आरटीई प्रवेश केले जाणार आहेत. त्यापैकी आतापर्यंत 885 शाळांनी नोंदणी केली असून, अद्याप 61 शाळांनी नोंदणी केली नाही. शाळांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. उर्वरित शाळांना उद्यापर्यंत (दि.30) नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही आणि अशा शाळांवर कारवाई होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

What is your reaction?
6 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)