मुंबई : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये राजभवनात 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिवसाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी दिली आहे. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे उपस्थित होते. या वर्षी लखनौमध्ये होणारा महाराष्ट्र दिवस सोहळा उत्तर प्रदेश सरकार, महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र समाज लखनौ, मराठी समाज उत्तर प्रदेश आणि भातखंडे संगीत विश्वविद्यालयाच्यावतीने 1 आणि 2 मे रोजी राजभवनातच आयोजित करण्यात आला आहे.
1 मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुख्य अतिथी असतील, तर उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति दिलीप बाबासाहेब भोसले आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे हे विशेष अतिथी असतील. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आणि सूचना मंत्री डॉ. नीळकंठ तिवारी हेही उपस्थित राहतील. 2 मे रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य तसेच मंत्री मंडळातील ज्येष्ठ मंत्री डॉ. रिटा बहुगुणा जोशी, लक्ष्मी नारायण चौधरी, आशुतोष टंडन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. असेही राज्यपाल नाईक यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा