उत्तर कोरिया सरळ येतोय !

अण्विक व क्षेपणास्त्र चाचण्यांवर बंदी घालण्याची केली घोषणा


किम यांच्या निर्णयाचे जगभर स्वागत

सेऊल – आपल्या अण्विक चाचण्यांबाबत सतत ताठर भूमिका घेऊन साऱ्या जगाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्तर कोरियाने अमेरिकेशी होणाऱ्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर या चाचण्यांवर स्वत:हून बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी स्वत: ही घोषणा केली. आपल्या पक्षाच्या मध्यवर्ती समितीची त्यांनी काल एक बैठक घेतली त्यात त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की कोरियाच्या भोवतालच्या जगात आता बदल होत आहेत. त्यामुळे कोरियन क्रांतीला अनुकुल असा निर्णय आपण घेत आहोत. उत्तर कोरियाने अण्विक सज्जतेची योग्य ती पातळी आता गाठली असल्याने आता आम्हाला अण्विक चाचण्या घेण्याची गरज उरली नसल्याचे त्यांनी गेल्या वर्षीच जाहीर केले होते. किम यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी लवकरच थेट चर्चा होणार आहे त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी स्वत:हून चाचणी बंदी लागू केली असून त्यांच्या या निर्णयाचे व्यापक स्वागत होत आहे.

आपल्या सरकारने पुंग्येरी येथील अण्विक चाचणी केंद्र बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे अशी घोषणाही त्यांनी केली आहे. तसेही हे केंद्र गेल्यावर्षी झालेल्या हायड्रोजन बॉंम्बच्या स्फोटामुळे निकामी ठरले होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने या निर्णयावर प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की ही अत्यंत चांगली बातमी आहे. उत्तर कोरिया आणि साऱ्या जगासाठी हा एक चांगला निर्णय आहे. त्यांचा हा निर्णय म्हणजे एक मोठी प्रगती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपण आता किम यांच्याशी होणाऱ्या भेटीबद्दल अधिक उत्त्सुक झालो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियानेही किम यांच्या या घोषणेचे स्वागत करताना म्हटले आहे की, कोरियन द्विपकल्प अण्विक मुक्त होण्याच्यादृष्टीेने ही एक चांगली घडामोड आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनीही या घोषणेचे स्वागत केले आहे. आता ही प्रक्रिया आणखी पुढे कशी जाईल, आणि त्याची खात्री कशी पटेल हे पहाणे अधिक महत्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)