उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन हजारों यात्रेकरू अडकले

  • महाराष्ट्रातील 100 जणांचा समावेश

गोपेश्‍वर – उत्तराखंडमध्ये भूस्खलन झाल्याने हजारों यात्रेकरू अडकून पडल्याचे वृत्त आहे. त्यात महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे 100 जणांचा समावेश असल्याचे समजते.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात भूस्खलनाची ही घटना घडली. त्यामुळे डोंगराचा भाग कोसळून ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग ठप्प झाला. महामार्गावर अनेक वाहने रखडल्याने हजारों यात्रेकरू अडकले. विष्णुप्रयागजवळ भूस्खलन झाल्याची माहिती समजताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. दरडी हटवून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या उद्देशाने युद्धपातळीवर कार्य हाती घेण्यात आले. त्यात बॉर्डर रोडस्‌ ऑर्गनायझेशनचे (बीआरओ) कर्मचारी सहभागी झाले. दरम्यान, भूस्खलनानंतर प्रामुख्याने बद्रीनाथ, जोशीमठ, कर्णप्रयाग, पीपलकोटी, गोविंदघाट येथे यात्रेकरू अडकून पडले आहेत. त्यांना भोजन आणि इतर सुविधा पुरवण्याच्या कार्यात प्रशासन गुंतले आहे. महामार्गावरून दरडी हटवण्याचे काम उद्या (शनिवार) दुपारपर्यंत चालेल. त्यानंतरच महामार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली. उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटना सातत्याने घडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)