उत्तरमांड धरणग्रस्तांवर उपासमारीची वेळ

नागरी सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष

चाफळ – चाफळ विभागातील उत्तरमांड धरणात बाधित ठरलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. धरण उशाला आणि कोरड घशारा अशीच अवस्था झाली असतानाच शेत जमिनींना पाणी न मिळणे, बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष, गावठाणातील अपुऱ्या नागरी सुविधांकडे शासनकर्त्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला आहे.

उत्तरमांड प्रकल्पात बाधित असलेल्या दहा ते पंधरा टक्के लोकांना जमिनी देणे बाकी असताना प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने प्रलंबित प्रश्न वेळीच मार्गी न लावल्यास धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेवू, असा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.
कराड व पाटण तालुक्‍यातील अनेक हेक्‍टर शेतीची तहान भागवणारे उत्तरमांड धरण नाणेगांव गावच्या हद्दीतील उत्तरमांड नदीवर बांधण्यात आले आहे.

शिवसेना-भाजपा युती शासनाच्या काळात मंजुरी मिळालेल्या या धरणाच्या बांधकामास सन 1999 मध्ये सुरुवात झाली होती. आज तब्बल 19 वर्षांनी युतीचेच सरकार सत्तेवर आले असतानाही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत, ही शोकांतिका आहे. नाणेगांव बुद्रुक, माथनेवाडी, गमेवाडी, चाफळ, जाळगेवाडी आदी गावातील जमिनी या प्रकल्पात बाधित ठरल्या आहेत. धरणातील बाधित धरणग्रस्त 19 वर्ष घरदार व जमिनीसापासून वंचित असल्याने हालअपेष्टा सोसत मोठ्या उमेदीने न्यायासाठी झुंज देत आहेत.

आजही धरणग्रस्तांचे पुनर्वसन झाले नाही. सध्या धरणात पाणीसाठा केला जात असतानाही बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींना पाणी मिळू शकलेले नाही.अजूनही पुनर्वसन बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांना जमिनींचे वाटप करण्यात आले आहे. त्यांना मूळ मालकांकडून जमिनी कसण्यास अडथळा केला जात आहे. ज्यांना घरासाठी नियोजीत गावठाणात जागा मिळाल्या आहेत. तिथे कोणत्याही प्रकारचे नियोजन नाही. गावठाणातील अठरा नागरी सुविधा सुस्थितीत नाहीत. अनेकांना बाधित घरांचे पैसे असो अथवा जमीन मिळू शकलेली नाही.

या मागण्यांबाबत धरणग्रस्तांचा राजकारण्यांनी केवळ मतापुरता वापर करत पोकळ अश्वासनांची खैरात केली. कोयनेतील धरणग्रस्तांना न्याय मिळू शकतो, तर मग आम्हाला का नाही ? असा प्रश्न विचारला जात आहे. केवळ याच प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून आज पाटण तालुक्‍यातील चाफळपासून कराड तालुक्‍यातील उंब्रजपर्यंत हरितक्रांती घडली आहे. याचा विचार करुन शासनाने धरणग्रस्तांचे प्रलंबित राहिलेले प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे
आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)