उत्तरप्रदेश निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार समाप्त

विधानसभेच्या 69 जागांसाठी उद्या मतदान
लखनौ – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठीचा प्रचार आज सायंकाळी समाप्त झाला. या टप्प्यात 69 जागांसाठी रविवारी (19 फेब्रुवारी) मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जाणारे मतदारसंघ लखनौ, कनौज, मैनपुरी, इटावा, बाराबंकी, कानपूर, हरदोई आदी 12 जिल्ह्यांत पसरलेले आहेत. या टप्प्यात एकूण 826 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य 2 कोटी 41 लाख मतदार ठरवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, बसपच्या प्रमुख मायावती या स्टार प्रचारकांमुळे प्रचाराची रंगत वाढली. सपचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांचा प्रचारातील सहभाग हे तिसऱ्या टप्प्याचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. पक्षातील यादवीच्या पार्श्‍वभूमीवर मुलायम पहिल्या दोन टप्प्यांत प्रचारापासून दूर राहिले होते.
मागील विधानसभा निवडणुकीचा विचार करता हे मतदारसंघ म्हणजे राज्यातील सत्तारूढ सपचे प्रभावक्षेत्र मानले जाते. मागील वेळी सपने 69 पैकी तब्बल 55 जागा खिशात घातल्या होत्या. बसप, भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांना अनुक्रमे 6, 5 आणि 2 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी उत्तरप्रदेशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. अखेरच्या टप्प्यासाठी 8 मार्चला मतदान होईल. त्यानंतर इतर चार राज्यांसमवेत उत्तरप्रदेशात 11 मार्चला मतमोजणी होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)